अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी (९/११) अल-कायदा या दहशतवादी संघटनेने घडवलेल्या हल्ल्यांना आज १४ वर्षे होत आहेत. जागतिक राजकारणाचा नूर पालटणाऱ्या या घटनेचे अमेरिकेसह आज जगभरात स्मरण होत आहे.
कारणे ..
सुरुवातीला नकार देऊन अखेर अल-कायदाने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकेचा इस्रायलला असलेला पाठिंबा, सौदी अरेबिया आणि अन्य देशांत मुस्लिमांविरुद्धच्या लढय़ांत अमेरिकी सैन्याचा सहभाग, इराकवरील र्निबध आदी कारणांमुळे हल्ला केल्याचे जाहीर केले.
परिणाम..
या हल्ल्यांत एकूण २,९९६ जणांचा बळी गेला, तर सुमारे १० अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
अमेरिकेने जगभर दहशतवादाविरुद्ध युद्ध (वॉर ऑन टेरर) घोषित केले. त्यात जे साथ देतील ते देश आपले, तर बाकीचे आपल्याविरुद्ध, अशी भूमिका घेऊन जगाची विभागणी केली. जागतिक राजकारणाला त्याने मोठी कलाटणी मिळाली. अनेक देशांनी दहशतवादाविरुद्ध कठोर कायदे केले.
अफगाणिस्तान आणि इराकवर हल् ले करून तेथील तालिबान आणि सद्दाम हुसैन यांच्या राजवटी उलथून टाकल्या. त्यापुढील दशकभराहून अधिक काळ तेथे सैन्य तैनात करून दहशतवादविरोधी लढा सुरू ठेवला. त्याला मर्यादित यश आले.

घटना..

अल-कायदाच्या १९ दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या चार प्रवासी विमानांचे उड्डाणानंतर थोडय़ाच वेळात अपहरण करून ती आपल्या ठरलेल्या लक्ष्यांच्या दिशेने वळवली. त्यातील दोन विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन मनोऱ्यांवर आदळली. तिसरे अमेरिकी संरक्षण दलाचे मुख्यालय असलेल्या व्हर्जिनियातील पेंटॅगॉन या इमारतीजवळ कोसळले, तर चौथ्या विमानाचे लक्ष्य वॉशिंग्टन डीसी होते. मात्र ते तेथून पेनसिल्व्हानिया राज्यात कोसळले.

शीख वृद्धावर हल्ला

न्यूयॉर्क : अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये वृद्ध शीख व्यक्तीला ‘ओसामा’, ‘दहशतवादी’ असल्याचे संबोधत अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ९/११ हल्ल्याच्या १४व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. इंद्रजित सिंग मुक्केर हे मारहाणीत गंभीर जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. इंद्रजित हे ८ सप्टेंबरला कारने दुकानात जात होते. या वेळी मागाहून येणाऱ्या कारमधील व्यक्तींनी दहशतवादी व ओसामा बिन लादेन असे संबोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी इंद्रजित यांनी त्यांना वाट देण्यासाठी आपली गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. या वेळी या व्यक्तींनीही गाडी थांबवत इंद्रजित यांना अमानुष मारहाण केली.