केरळमधील कान्नुर जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम  परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात दोन व्यक्ती कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी होत्या. दोन्ही व्यक्ती एकमेकांशी हसत छान गप्पा मारत होत्या..एका घटनेतील छायाचित्रांमुळे या दोन्ही व्यक्ती माध्यमांमध्ये प्रकाशझोतात आल्या होत्या. ही छायाचित्रे होती २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीची.
छायाचित्रातील एक चेहरा दंगलीतील पीडिताचा आहे. रक्ताचे शिंतोडे शर्टावर उडालेले, डोळ्यांत अश्रू आणि हात जोडून दयेची विनवणी, तर दुसऱया बाजूला डोक्यावर भगवी पट्टी, चेहऱयावर राग-रोष आणि हातात लोखंडी सळी, मागे जाळपोळ..
दयेची विनवणी करताना दिसणारा व्यक्ती एक टेलर आहे. नाव- क्युताबुद्दीन अन्सारी, गुजरात दंगलीचा साक्षीदार आणि दुसरा दंगलीत सहभाग घेणारा अशोक मोची. हे दोघेही गुजरात दंगलीतील विरोधी चेहरे एकत्र आले होते ‘हिंदू-मुस्लिम’ एकतेसाठी. आज हे दोघेही आपआपले व्ययक्तीक जीवन जगत असले, तरी हिंदू-मुस्लिम एकता देशात अबाधीत राहावी या विचाराने दोघेही या परिसंवादात एकत्र आले होते. अशोक मोचीने या परिसंवादात झालेल्या चुकांची अन्सारी आणि संपूर्ण मुस्लिम समाजाची माफी मागितली. तसेच झालेला प्रकार आयुष्यातील वाईट घटनेप्रमाणे असल्याचेही त्याने म्हटले. दोघांनीही गुजरात दंगलीतील घटनांना उजाळा देऊन दंगलीचे आणि त्यानंतर निर्माण होणाऱया अडचणींचे भयाण रूप मांडले. देशातील एकतेमध्येच सर्वांचे भले आहे आणि यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत असेही दोघे म्हणाले.