चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी हाँगकाँगमधल्या आंदोलकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. चीनचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांना आम्ही चिरडून टाकू अशी धमकीच जिनपिंग यांनी दिली आहे. नेपाळ दौऱ्यावर रविवारी जिनपिंग यांनी हे विधान केले. चीनची वाहिनी सीसीटीव्हीच्या हवाल्याने बीबीसीने हे वृत्त दिले आहे.

हाँगकाँगमध्ये शांततामय मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी निघणारे अनेक मोर्चे हिंसाचारामध्ये बदलत आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकी झडत आहेत. सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे आणि चीनच्या बाजूने असलेल्या दुकानांचे नुकसान करण्यात येत आहे. रविवारी हाँगकाँग मेट्रोच्या २७ रेल्वे स्थानकांवर वाहतूक पूर्णपणे बंद होती.

आंदोलकांना पांगवण्यासाठी कमीत कमी बळाचा वापर केला असे पोलिसांनी सांगितले. टेलिव्हिजन फुटेजमध्ये वीकेंडला खरेदीसाठी निघालेले लोक आंदोलनामध्ये अडकून पडल्याचे दिसत होते. काही जण जखमी झाले होते. अनेकजण रडत होते. पोलीस अधिकारी शॉपिंग सेंटरच्या दिशेने धावत होते. एकूणच रविवारी हाँगकाँगच्या रस्त्यावर गोंधळाची स्थिती होती.

माँग कॉक पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्याची प्रकृती आता स्थिर आहे असे दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने म्हटले आहे. संशयित गुन्हेगारांचे चीनकडे प्रत्यार्पण करण्याच्या प्रस्तावामुळे जून महिन्यापासून हाँगकाँगमध्ये आंदोलनाची सुरुवात झाली. या निर्णयामुळे हाँगकाँगच्या न्यायिक स्वातंत्र्याचे खच्चीकरण होईल अशी भिती अनेकांना आहे. यासंबंधी विधेयक मागे घेण्यात आले. पण आंदोलनाचा सर्वत्र प्रसार झाला. आता पूर्ण लोकशाहीसह पोलीस अत्याचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलन सुरु झाल्यापासून आतापर्यंत २३०० लोकांना अटक झाली आहे.