आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा ठरविला जाऊ नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच भारतीय दंडविधान संहितेत बदल करणार असून, त्यातील कलम ३०९ रद्द करण्यात येणार आहे. १८ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांनी या बदलाला पाठिंबा दिला आहे.
भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३०९ नुसार आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा आहे. त्यामुळे आत्महत्या करताना कोणी आढळल्यास त्याला या कलमानुसार एक वर्षाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. मात्र, विधी आयोगाने त्यांच्या अहवालात हे कलम रद्द करण्याची शिफारस केली होती, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये दिली होती. त्यानुसार हे कलम रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. केंद्र मंत्रिमंडळाने कलम रद्द करण्याला मंजुरी दिल्यानंतर यासंबंधीचे विधेयक संसदेमध्ये मांडले जाईल. संसदेने त्याला मंजुरी दिल्यावरच हे कलम रद्द होईल.