फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. रविवारी रात्री पॅरिस शहरातील इंडियन एअर फोर्सच्या राफेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला. फ्रान्समध्ये  राफेल फायटर विमानांच्या उत्पादनाचे काम सुरु आहे. हे काम पाहण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी इंडियन एअर फोर्सची एक टीम पॅरिसमध्ये आहे.

हा हेरगिरीचा प्रयत्न असून राफेल विमानांसंबंधीची माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने राफेल अत्यंत महत्वाचे फायटर विमान आहे. हार्ड डिस्क तसेच कागदपत्रांच्या चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ग्रुप कॅप्टन रँकचा अधिकारी या टीमचा प्रमुख आहे. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे. भारत डासू कंपनीकडून ही विमाने विकत घेणार आहे. एअर फोर्सने दिल्लीत संरक्षण मंत्रालयाला या घटनेची माहिती दिली.

भारतात राफेल फायटर विमानांच्या खरेदीवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. या विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सत्तेवर आल्यास आम्ही राफेल खरेदी कराराची चौकशी करु असे काँग्रेसने म्हटले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताला पहिले राफेल विमान मिळेल.

फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर डॉगफाईट झाली होती. त्यावेळी राफेलची गरज प्रकर्षाने जाणवली होती. बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी राफेल विमान ताफ्यात असते तर निकाल वेगळा असता असे पंतप्रधानांपासून हवाई दल प्रमुखांनी म्हटले आहे. हे विमान ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारताची हवाई हल्ल्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.