काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर हवाई मार्गाने शस्त्रे व दारूगोळा उतरवण्याचा डाव सीमा सुरक्षा दलाने शनिवारी उधळून लावला. दक्ष असलेल्या फौजांनी अरनिया सेक्टरमध्ये भारताच्या हवाई हद्दीत शिरलेल्या दोन ड्रोन्सवर गोळीबार केला.

पहाटे ४.३० ते ४.४५ च्या दरम्यान ही दोन्ही मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) जब्बोवाल आणि विक्रम सीमा चौकी भागात घिरट्या घालत असलेली दिसून आली. ही ड्रोन्स खाली पाडण्याच्या उद्देशाने बीएसएफच्या जवानांनी गोळीबाराच्या १५ फैरी झाडल्यानंतर ती पाकिस्तानी बाजूला परत गेली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

२००३ साली केलेल्या शस्त्रसंधी कराराचे २५ फेब्रुवारीपासून पालन करण्याचे भारत व पाकिस्तान यांनी मान्य केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सीमेवर शांतता आहे. असे असतानाही शस्त्रे व अमली पदार्थ भारतात टाकण्यासाठी पाकिस्तान ड्रोन्सचा वापर करत आहे.

‘पाकिस्तान व भारत यांच्यात शस्त्रसंधीचा करार असूनही पाकिस्तान रेंजर्सनी भारताविरुद्धच्या कुटिल कारवाया थांबवल्या नसून, जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर कुहेतूने काम करतच आहेत. आज अरनिया येथील बीएसएफच्या दक्ष फौजांनी पाकिस्तानी ड्रोन्सच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानी बाजूने भारतीय हद्दीत प्रवेश करताना दिसताच फौजांनी तत्काळ गोळीबार केल्यानंतर त्यांना पाकिस्तानी हद्दीत परतणे भाग पडले’, असे बीएसएफचे उपमहानिरीक्षक एसपीएस संधू यांनी एका निवेदनात सांगितले.

पाकिस्तान शस्त्रे व दारूगोळा भारतात पाठवण्यासाठी ड्रोन्सचा वापर करू शकतो अशी माहिती बीएसएफच्या गुप्तवार्ता शाखेला मिळत होती, असेही संधू म्हणाले.