‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या (आरएसएस) मंचावर उपस्थिती लावणे म्हणजे त्यांच्या विचारांचा स्विकार करणे नाही, असं विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केले. रविवारी पार पडलेल्या संघाच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांसह अझीम प्रेमजीही त्या मंचावर उपस्थित होते. संघाशी निगडीत ‘राष्ट्रीय सेवा भारती’च्या ‘राष्ट्रीय सेवा संगम’ संमेलनात सहभागी होण्यासाठी ते आले होते. संघाच्या कार्यक्रमाला येणे म्हणजे संघाच्या विचारांचा स्विकार करणे मानले जाईल अशी शंका अनेकांनी व्यक्त केल्याचे, असं यावेळी बोलताना प्रेमजी म्हणाले. परंतु, संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एखाद्या व्यक्तिच्या अथवा संस्थेच्या मंचावर उपस्थिती लावणे म्हणजे पुर्णपणे त्यांच्या विचारांचा स्विकार करणे, असा याचा अर्थ होत नसल्याचे त्यांनी सांगितले. संघाने समाजासाठी फार मोठे कार्य केले असून, मी त्याचा सन्मान करतो. यावेळी प्रेमजींनी भ्रष्टाचाराविरूध्द प्रत्येक पातळीवर लढायला हवे सांगताना स्त्रिया, मुले आणि समाजातील वंचितांच्या उध्दारासाठी काम करण्याचे आवाहनदेखील उपस्थितांना केले. देशात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. देश निर्मितीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखीत करत ते म्हणाले, शिक्षणाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम शिक्षणामुळे विकास साधण्याच्या क्षमतेत वाढ होऊन, एका चांगल्या सामाजाची निर्मिती होते. शैक्षणिक संस्था ह्या नफेखोरी करणाऱ्या नसाव्यात. प्रामुख्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणसंस्थांनी याची दक्षता घ्यायला हवी. भारतीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला जास्त वाटा मिळत नसल्याबद्दलदेखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रेमजींव्यतिरिक्त या कार्यक्रमात ‘जीएमआर’ समुहाचे जीएम राव आणि ‘एस्सेल’ ग्रुपचे प्रमुख सुभाष चंद्रादेखील उपस्थित होते.