न्यायपालिकेविरुद्ध आरोप करणारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी व त्यांचे प्रधान सल्लागार यांची वर्तणूक ‘सकृतदर्शनी अवज्ञाकारी’ असल्याचे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सोमवारी सांगितले. तथापि, सरन्यायाधीशांना या प्रकरणाची कल्पना असल्याचे सांगून या दोघांविरुद्ध न्यायालयीन अवमानाची कार्यवाही सुरू करण्याची परवानगी त्यांनी नाकारली.

‘आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा उपयोग आपले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यासाठी व उलथून लावण्यासाठी होत आहे’, असा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांनी ६ ऑक्टोबरला सरन्यायाधीशांना लिहिले होते.

रेड्डी यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्राचा वेणुगोपाल यांनी सोमवारी हवाला दिला. या पत्रातील मजकूर सार्वजनिक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजेय कल्लाम यांनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे संशय उद्भवला असल्याचे ते म्हणाले.

‘या पार्श्वभूमीवर, सकृत्दर्शनी या दोघांची वर्तणूक अवज्ञाकारी आहे. मात्र, अवमानाचे हे संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्र्यांनी थेट सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातून आणि त्यानंतर कल्लाम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उद्भवले आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांना या प्रकरणाची कल्पना आहे. तेव्हा मी हे प्रकरण हाताळणे योग्य ठरणार नाही’, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.