अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. तर, काँग्रेस व डाव्या पक्षांना मोठ्या अपयशाला समोरं जाव लागलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतलेल्या ठिकाणच्या त्यांच्या उमेदवरांचे तर डिपॉझिटही जप्त झाल्याचं समोर आलं आहे, यावरू भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“लौकिक आणि परफॉर्मन्स कायम राखल्याबद्दल राहुलजींचे अभिनंदन. पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त.” असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या आघाडीच्या वाटेला केवळ एक जागा आल्याचं राज्यातील विधानसभा निकालानंतर स्पष्ट झालं आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं तिसऱ्या आघाडीला पूर्णपणे नाकारल्याचं यावरुनच लक्षात येत आहे की, तिसऱ्या आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. इतकचं नाही तर ज्या दोन मतदारासंघांसाठी राहुल गांधींनी प्रचारसभा घेतल्या त्या दोन्ही मतदार संघांमध्येही काँग्रेसचा पराभव झाला आहे.

पश्चिम बंगाल : राहुल गांधींनी प्रचारसभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमधील काँग्रेस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

सर्वच्या सर्व २९२ जागा तिसऱ्या आघाडीने लढवल्या होत्या. तिसऱ्या आघाडीतील सदस्य पक्ष असणाऱ्या भारतीय धर्मनिरपेक्ष मोर्चाने काँग्रेस आणि डाव्या घटक पक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये एका जागेवरही विजय मिळवता आलेला नाही.