केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागील दहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणातील शेतकरी करत असून अनेक महिन्यांपासून ते दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेले आहेत. तिन्ही कायदे सरकारने रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम असून, दिल्लीशिवाय पंजाबमध्येही मोठ्यासंख्येने हे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी राज्याच्या विकासात अडथळा आणण्याऐवजी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिला आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचा दिला सल्ला दिला आहे. किसान आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत देशव्यापी अराजक माजविण्याचे षड्यंत्र आहे, त्याचा हा पुरावा. पंजाबात सत्ता असल्यामुळे तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव.” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

‘शेतकऱ्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावं; पंजाबच्या विकासकामात अडथळा आणू नये’

“आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवी दिल्लीतील केंद्र सरकारवर लक्ष केंद्रित करावे. राज्य सरकार आणि प्रशासनाला या मोहिमेतून दूर ठेवावं. जर तुम्हाला केंद्र सरकारवर दबाव तयार करायचा असेल तर तुमचं आंदोलन दिल्लीला हलवा. तुमच्या आंदोलनाने पंजाबला त्रास देऊ नका. आजही शेतकरी राज्यातील ११३ ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि त्याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे,” असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले आहेत.