बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांनी अतुल गवांदे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे. अतुल गवांदे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेत बॉस्टन शहरात या कंपनीचे कार्यालय असेल. या कंपनीच्या स्थापनेमागे खोऱ्याने नफा कमावण्याचा उद्देश नाही असे तिन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे. आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.

बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन चेस यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गवांदे स्वत: उत्तम लेखक आहेत. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतातत. एंडोक्राईन शस्त्रक्रियेचे ते तज्ञ आहेत. हार्वड टीएच चान स्कूल, हार्वड मेडिकल स्कूलमध्ये ते प्राध्यापक आहेत. बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.

या पुस्तकातून त्यांनी वृद्धांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता. बर्कशायर हॅथवे ही प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांची कंपनी आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांच्यासोबत मिळून बफे ही नवीन कंपनी सुरु करण्यावर काम करत होते. नव्या कंपनीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे ते आपल्यापरीने उत्तम योगदान देतील आणि वैद्यक क्षेत्रातील वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवतील अशी अपेक्षा बफे यांनी व्यक्त केली.

प्रमुख म्हणून अतुलची आम्ही निवड केली असून तो त्याची जबाबदारी उत्तमपरीने निभावेल यावर मला, जामी आणि जेफला पूर्ण विश्वास आहे असे बफे यांनी सांगितले. अमेरिकेत आरोग्य सेवेचा खर्च उद्योगांवर भारी पडत आहे असे बफे यांनी सांगितले. कमी किंमतीत आरोग्य सेवा देण्याचा हेतू असल्यामुळे कंपनी यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही असे बफे म्हणाले. बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन या तिन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul gawande ceo of amazon berkshire jpmorgan new joint healthcare venture
First published on: 21-06-2018 at 12:53 IST