लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली जयानगर पोलिसांनी खासगी कंपनीत ऑडिटरचे काम करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्रवीण हेगडे असे आरोपीचे नाव आहे. मेट्रो ट्रेनमध्ये प्रवीणने त्याच्या पँटची चेन उघडून शेजारी उभ्या असलेल्या महिला प्रवाशाबरोबर अश्लील कृती केल्याचा आरोप आहे. बंगळुरु मेट्रोमध्ये प्रवीणने त्याच्या पँटची चेन उघडली व शेजारी उभ्या असलेल्या महिला प्रवाशाला तो गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार लक्षात येताच संबंधित महिलेने अन्य प्रवाशांना सतर्क केले. या प्रवाशांनी मिळून प्रवीणला पकडले व मारहाण केली नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना सोमवारी घडली. तक्रारदार महिला बेलांदूर येथील खासगी कंपनीत नोकरीला आहे. तिने संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास बानाशंकरी येथे जाण्यासाठी राजाजीनगर मेट्रो स्थानकातून ट्रेन पकडली.
प्रवीण आपल्या मागे उभा होता व सतत अंगाला चिकटण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी त्याला अंतर राखून उभे राहायला सांगितले तेव्हा त्याने ट्रेनमध्ये गर्दी असून उभ राहायला जागा नसल्याचे कारण दिले असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. विविध कलमांखाली प्रवीण विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या तो तुरुंगात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 5, 2018 10:03 am