ऑगस्ट २०२१ महिन्यात किरकोळ महागाई दरात किंचित घट झाली आहे. महागाई दर ऑगस्ट महिन्यात ५.३० टक्क्यांवर राहिला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ऑगस्टच्या महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये किरकोळ महागाई दर हा ५.५९ टक्के इतका होता. म्हणजेच जुलै महिन्याच्या तुलनेत ०.२९ टक्क्यांची घट झाल्याचं दिसून येत आहे. जुलै महिन्यात भाज्यांचे दर वाढल्याने त्याचा परिणाम दिसून आला होता. गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी महागाई दर नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ग्रामीण क्षेत्रातील महागाई दर ५.२८ टक्के होता. तर शहरी भागातील महागाई दर ५.३२ टक्के होता.

ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थांचे दर ३.११ टक्क्यांनी वाढले आहेत. हा दर जुलै महिन्यात ३.९६ टक्के इतका होता. दरम्यान खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. खाद्यतेलाच्या किंमती ३३ टक्क्यांनी वाढल्याचं दिसत आहे. जुलै २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर आरबीआयने वर्तवलेल्या अंदाजानुसार होता. जुलैपूर्वी सलग दोन महिने किरकोळ महागाई दर हा ६ टक्क्यांचा वर होता.

मे महिन्यात किरकोळ महागाई दर हा ६.३० टक्के होता. या दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे वाहतुकीचा खर्च वाढला होता, त्याचा परिणाम महागाई दरावर झाला. त्याच वेळी, जूनमध्ये किरकोळ महागाई किरकोळ कमी ६.२६ टक्के होता.

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय; NEET परीक्षेतून सूट देणारं विधेयक पास

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र अजूनही पावसाबद्दल अंदाज बांधले जात आहेत. खरीप पिकाच्या कापणीचा हंगाम आल्यावर महागाई नियंत्रणात येईल, असा अंदाज आरबीआयने बांधला आहे.