द हेग : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात तेथील लष्कराने जी कारवाई केली होती त्यात वंशहत्येचा हेतू असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत असे म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणी सुनावणीवेळी सांगितले.

त्या म्हणाल्या की, लष्कराने कदाचित बळाचा अतिरेकी वापर केला असेलही पण याचा अर्थ त्यामागे वंशहत्येचा हेतू होता असा नाही.  त्यामुळे हा आरोप कपोलकल्पित आहे.

म्यानमार विरोधात गांबियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात वंशहत्येचा खटला दाखल केला असून त्याच्या सुनावणीसाठी आँग सान स्यू की या परराष्ट्रमंत्री या नात्याने उपस्थित होत्या. ऑगस्ट २०१७ मध्ये मान्यमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत  अनेक लोक मारले गेले होते, तर सात लाख रोहिंग्या हे शेजारच्या बांगलादेशात पळून गेले होते.