म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांच्यावर आसियान बैठकीत रोहिंग्या शरणार्थीच्या मुद्दय़ावर टीका करून दबाव वाढवण्यात आला आहे. मात्र रोहिंग्यांच्या प्रकरणात आसियान हस्तक्षेप करू शकत नाही अशी  हतबलताही व्यक्त केली.

रोहिंग्यांच्या प्रश्नावर आँग सान स्यू की यांनी मौन पाळले आहे ते बरोबर नाही, पण आम्ही यात हस्तक्षेप करून तोडगा काढू शकत नाही, असे आसियानच्या बैठकीत सांगण्यात आले. म्यानमारमधील रखाइन प्रांतातून सात लाख रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात पळून गेले आहेत. असोसिएशन ऑफ साउथईस्ट आशियन नेशन्स व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या शिखर परिषदेत रोहिंग्यांचा प्रश्न उपस्थित  करण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी समारोपाच्या पत्रकार परिषदेत सांगितले, की आम्ही रखाइन प्रांतातील परिस्थितीवर रविवारी चर्चा केली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन यांनी म्हटले आहे, की आँग सान स्यू की यांनी आतापर्यंत या प्रश्नावर भाष्य केलेच नाही असे नाही. त्यांनी विस्ताराने त्यावर मते मांडली आहेत. आसियान परिषदेत त्यावर चर्चा झाली, ती रचनात्मक स्वरूपाची होती. आसियान देशांना रोहिंग्यांच्या प्रश्नावर चिंता वाटते, पण त्यात आम्ही जबरदस्तीने  हस्तक्षेप करू शकत नाही, असे टर्नबुल यांनी स्पष्ट केले.

लष्कराने रखाइन प्रांतात केलेल्या अत्याचारांची आसियान देशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करावी, अशी मागणी मुस्लिम बहुल मलेशियाने केली आहे. रोहिंग्या प्रश्नामुळे प्रादेशिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते असा इशारा मलेशियाचे नेते नजीब रझाक यांनी दिला असून, आंग सान स्यू की यांच्यावर दबाव

वाढवण्याची गरज प्रतिपादन केली आहे. ली यांनी सांगितले, की रखाइन प्रांतात दहशतवादी गट कार्यरत असल्याची कुठलीही गुप्तचर माहिती अजून सिंगापूरकडे नाही. आसियान गटात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपीन्स, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असून, हा गट १९७४ मध्ये स्थापन झाला आहे.

आँग सान स्यू की ऑस्ट्रेलियात

म्यानमारच्या नेत्या आँग सान  स्यू की या सिडनी येथील लॉवी इन्स्टिटय़ूट येथे भाषणासाठी ऑस्ट्रेलियात आल्या असून, त्या टर्नबुल  यांच्याशी चर्चा करतील, पण ऑस्ट्रेलियात आल्यापासून त्यांनी अजूनतरी काहीही बोलण्याचे टाळले आहे. मंगळवारी पत्रकार परिषद होणार असून, त्यांच्यावर त्यात प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता आहे.