दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे काकीच्या संमतीने  तिच्या प्रियकराने पुतणीवर बलात्कार केला. काकीने भुलवून तिच्या पुतणीला घराबाहेर आणले. त्यानंतर तिला जबरदस्तीने मद्य पाजले व प्रियकराला बलात्काराची परवानगी दिली. रविवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलीच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाल्याने सोमवारी सकाळी तिच्या वडिलांनी बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बलात्कार झाल्याचे स्पष्ट केले. मुलीच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाही.

पोलिसांनी ३० वर्षीय महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर फरार आहे. मुकेश कुमार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. काकीने आणि तिच्या प्रियकराने आधीच बलात्काराचा हा कट रचला होता असा पोलिसांना संशय आहे. पीडित मुलीचे आई-वडील विभक्त झाले आहेत त्यामुळे मुलगी वडिलांसोबत राहते. आरोपी काकी सुद्धा त्याच भागात राहणारी असून आई नसल्यामुळे ती या कुटुंबाची काळजी घेत होती.