त्यांचं भुंकणं हे चावण्यापेक्षा वाईट आहे. अर्थात त्याचा दराराही मोठा आहे. कुणी त्याच्या आसपास फिरकण्याची हिंमतही करीत नाही. तो आहे एक इमानदार कुत्रा. त्याचं नाव आहे चार्ली. अलीकडेच त्याच्या भुंकण्याची गिनीज बुकात नोंद झाली. त्याच्या भुंकण्याच्या आवाजाची तीव्रता आहे ११३.१ डेसिबल म्हणजे रॉक संगीत मैफलीतील आवाज किंवा पोलाद कारखान्यातील आवाजाइतकी.
चार्ली हा सहा वर्षांचा कुत्रा गोल्डन रिट्रिव्हर प्रजातीचा आहे. अ‍ॅडलेड येथे त्याचे वास्तव्य आहे. जोरात भुंकण्याचा विक्रम त्याने एका राष्ट्रीय स्पर्धेत मोडला. जागतिक पातळीवर त्याच्या आवाजाने मोठाच दरारा निर्माण केला असून त्याची दाद गिनीज बुकच्या जागतिक विक्रम अकादमीने घेतली आहे.
यापूर्वीची नोंद जर्मन शेफर्ड प्रजातीच्या लंडन येथील कुत्र्याच्या नावावर होती. तो विक्रम २००९ मधला असून त्या कुत्र्याचा आवाज १०८ डेसिबल होता.
आताच्या विक्रमवीर चार्लीचा मालक बेलिंडा फ्रीबेर्न यांनी सांगितले, की आमचा हा कुत्रा अतिशय खोलवरचा आवाज भुंकताना काढतो, त्यामुळे त्याची तीव्रता ही रॉक बँडइतकी आहे.
अगदी एक वर्षांचा असतानापासून त्याचा आवाज असा खणखणीत व सर्वाना धडकी भरवणारा आहे. असे असले तरी शेजाऱ्यांची कुठलीही तक्रार नाही, कारण तो सांगितले तरच भुंकतो. तो घरात सतत भुंकत नाही. शांत असतो. आपण व आपल्या तीन मुलींना या कुत्र्याचा अभिमान आहे, कारण त्याने जागतिक विक्रम केला आहे.
 मानवी कानांना ६० डेसिबलपर्यंतचा आवाज कळतो, पण काही प्राणी त्यापेक्षा जास्त मोठा म्हणजे १०० डेसिबलचा आवाज काढतात. उपनगरी रेल्वेचा आवाज साधारण १०० डेसिबलचा असतो, असे ऑस्ट्रेलियन जिऑग्राफिकने म्हटले आहे.