ऑस्ट्रेलियातील सिडनीत पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. विमानात बॉम्ब स्फोट घडवण्याचा संशयित दहशतवाद्यांचा कट होता. पोलिसांनी याप्रकरणात चार जणांना अटक केली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील सुरक्षा यंत्रणा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या समर्थकांच्या हालचालींवर नजर ठेवून होत्या. सिडनीतील काही तरुण बॉम्ब स्फोटाचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी सिडनीतील एका घरातून चार जणांना अटक केली. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस आयुक्त एंड्रयू कॉल्विन आणि पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली. अटक केलेले चौघे जण हे विमानाच्या आतमध्ये स्फोट घडवून विमान पाडण्याचा कट रचत होते असा दावा पोलिसांनी केला आहे. कोणत्या विमानात ते स्फोट घडणार होते, विमानतळाच्या आतमध्ये बॉम्ब कसा नेणार होते, कधी आणि कुठे हा स्फोट घडवण्याचा कट होता, या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून चौघांची कसून चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. हे चौघेही इस्लामचे कट्टर समर्थक होते अशी माहितीही पोलिसांनी दिली.

दरम्यान, विमानात स्फोट घडवण्याचा कट उधळून लावण्यात आला असला तरी यानंतर देशभरातील विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे आणि तपासणीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान टर्नबुल यांनी केले आहे. तपासणीसाठी आता जास्त वेळ लागू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियामधून आत्तापर्यंत सुमारे १०० तरुण आयसिसमध्ये भरती झाले आहेत. यातील काही जण सीरिया आणि इराकमधून पुन्हा ऑस्ट्रेलियात परतल्याचे वृत्त आहे.