‘मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता बोइंग विमान शोधण्यात अनंत अडचणी येत असल्या, तरी आम्ही अद्याप आशा सोडलेली नाही. या विमानाचा शोध घेतला जाईल आणि त्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही’, अशा स्पष्ट शब्दांत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी विमानाची शोधमोहीम सुरूच राहण्याची ग्वाही दिली.
गेल्या २३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन विमानाचा शोध हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात सुरू आहे. तब्बल अडीच लाख चौरस किमी परिसरात या विमानाचा शोध सुरू असून त्यात सात देशांची दहा विमाने आणि दहा जहाजे सहभागी झाली आहेत. पर्थपासून अडीच हजार किमीवर असलेल्या संभाव्य ठिकाणाऐवजी आता ईशान्येकडे ११०० किमीवरील खोल समुद्रात आता ही मोहीम केंद्रित करण्यात आली आहे.
याआधी या संपूर्ण परिसरात तरंगत असलेल्या सर्व वस्तूंचे पृथक्करण करण्यात आले असून, त्यात बेपत्ता विमानाचा मागमूस लागलेला नाही. मात्र, तरीही विमानाचा शोध जारीच राहील असे अ‍ॅबॉट यांनी स्पष्ट केले. अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून निघणारे पिंग दिवसेंदिवस क्षीण होत जातील व त्यानंतर त्याचाही थांगपत्ता लागणार नाही. असे असले, तरी पिंगर लोकेटरच्या साह्य़ाने सागराच्या तळाशी या विमानाचा शोध सुरू राहील, असे अ‍ॅबॉट यांनी सांगितले.

मलेशियाचे घूमजाव
बेपत्ता विमान हिंदी महासागरात कोसळले असून त्यातील कोणताही प्रवासी वाचलेला नाही, अशा प्रकारचे विधान पंतप्रधान नजीब रझाक यांनी कधी केलेच नाही, असा पवित्रा आता मलेशियाचे काळजीवाहू वाहतूकमंत्री हिशामुद्दिन हुसेन यांनी घेतला आहे. शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी रझाक स्वत: ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कॉकपीट सुरक्षा वाढवणार
बोइंग दुर्घटनेपासून धडा घेत आता मलेशियन एअरलाइन्सने कॉकपीटच्या सुरक्षेत अधिक वाढ केली आहे. कॉकपीटमध्ये वैमानिक किंवा सहवैमानिक एकटा राहणार नाही याची दक्षता यापुढे घेण्यात येणार आहे. तर कॉकपीटमध्ये कोणाही आगंतुकाला प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सर्व प्रवाशांना आता कमरेचा पट्टा, बूट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल आदींचे स्वतंत्र स्कॅनिंग करून घ्यावे लागेल, तर बाटलीबंद पाणी विमानात नेता येणार नाही, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

ही शोधमोहीम आमच्यासाठीच नव्हे तर सर्वासाठी आव्हान आहे. अपघातग्रस्त विमानातील दुर्दैवी प्रवाशांच्या आप्तेष्टांसाठी, त्यांच्या देशांच्या सरकारांसाठी, विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी, हवाई वाहतुकीच्या सुरक्षेसाठी ही शोधमोहीम अत्यंत आवश्यक असून, आम्ही ती कोणत्याही परिस्थिती जारीच ठेवू. शिवाय मानवतावादी दृष्टिकोन ठेवला की जगातील सर्वच देश मदतीसाठी धावून येतात, हेच या शोधमोहिमेतून प्रतीत होत आहे.
– टोनी अ‍ॅबॉट,
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान.