जर्मनीने अलीकडेच दुर्गामातेची मूर्ती भारताला परत दिल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या कलासज्जेत असलेली गौतम बुद्धाची शिल्पकृती भारताला परत दिली जाणार आहे.
बुद्धाची ही बसलेल्या अवस्थेतील मूर्ती उत्तर प्रदेशातील मथुरेची असण्याची शक्यता आहे. सध्या ती ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे राष्ट्रीय कला सज्जेत आहे असे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ाच ही मूर्ती परत करण्याबाबतची सूचना ऑस्ट्रेलियाच्या कला सज्जेने भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवली आहे. हे शिल्प वालुकाश्माचे बनवलेले असून तशी शिल्पे मथुरेतच आढळतात. कॅनबेरा येथील कला सज्जेने भारताला अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यास सांगितले आहे, ही बुद्धाची मूर्ती पहिल्या शतकातील असून ही मूर्ती हरवल्याबाबत पोलिसांकडे कुठलीही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, या वालुकाश्माच्या शिल्पात मथुरा शैली दिसते तेथे शेकडो वर्षांपूर्वी बौध्द धर्माचे केंद्र होते. उत्तर प्रदेशातील राज्य पुरातत्त्व संग्रहालयात बुद्धाच्या तशा मूर्ती आहेत. त्यामुळे मथुरेतील ती मूर्ती संबंधित असू शकते. कुख्यात कला वस्तू विक्रेता सुभाष कपूर यानेच या मूर्तीची देशाबाहेर तस्करी केली असावी असा संशय पुरातत्त्व खात्याने व्यक्त केला आहे.