मुळची केरळची रहिवाशी असलेली एक महिला आणि तिचा प्रियकर या दोघांना २० वर्षांपेक्षा अधिक वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ऑस्ट्रेलियातील कोर्टाने सुनावली आहे. २०१५ मध्ये आपल्या पतीची विष देऊन हत्या केल्याप्रकरणी ही महिला दोषी ठरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोफिया सॅम (वय ३३) हीला २२ वर्षांचा तुरुंगवास तर तिचा प्रियकर अरुण कामालसनन याला २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१५मध्ये या दोघांनी मिळून सोफियाचा पती सॅम अब्राहम याची फळाच्या रसामध्ये विष घालून हत्या केली होती. याप्रकरणी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिअन सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. दरम्यान, सर्व पुरावे सोफिया आणि अरुणच्या विरोधात जाणारे असल्याने ते या प्रकरणी दोषी आढळले, त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली.

निकाल देताना न्यायाधिशांनी म्हटले की, दोघेही दोषी सहानुभूतीचे लायक नाहीत, कारण त्यांनी केलेला प्रकार हे पूर्वनियोजित हत्याकांड होते. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कोर्टातील युक्तीवादानुसार, ३६ वर्षीय अरुणने सॅमच्या फॅमिली गॅरेजमध्ये घुसून खिडकीतून घरात प्रवेश केला होता, त्यानंतर त्याने सॅमला ज्युसमधून विष पाजले.
दरम्यान, सोफियाने आपल्या पतीचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले आणि त्याचा मृतदेह केरळला घेऊन गेली. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा ती मेलबोर्नला परतली. मात्र, त्यानंतर सॅमच्या मित्रांनी पोलिसांना कळवले की, सोफिया ऑस्ट्रेलियात आल्यानंतर अरुणसोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. त्यामुळे सॅमच्या मृत्यूची कसून चौकशी करण्यात यावी.

या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सॅमच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यात सायनाईड या घातक विषाचे अंश सॅमच्या रक्तात आढळून आल्याचे म्हटले होते. त्यानंतर पोलिसांना हत्येचा संशय आल्याने त्यांनी सोफियाचे फोन कॉल्स तपासले त्यात सर्व बाब उघड झाली. त्यानंतर सोफिया आणि अरुणवर २०१६ मध्ये अटकेची कारवाई करण्यात आली. वर्षभर हे दोघे या हत्येची तयारी करीत असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितले.

दरम्यान, केरळातील कोलम येथे राहणाऱ्या सॅमच्या नातेवाईकांनी सोफिया आणि तिचा प्रियकर अरुण यांना कोर्टाने कठोर शिक्षा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.