आशिया प्रशांत क्षेत्रातील देश हे वेगाने प्रगती करीत असले तरी उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम किंवा चीनचे शेजारी देशांशी असलेले सीमावाद यासारखे मुद्दे त्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळेच या आशियाई देशांनी संघर्ष की सहकार्य याचा निर्णय केला पाहिजे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ब्रिस्बेन विद्यापीठातील कार्यक्रमात केले.  ‘जी-२०’ परिषदेच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेले ओबामा यांनी ब्रिस्बेन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर मुक्त संवाद साधला. ते म्हणाले, येणारे शतक हे आशियाई देशांच्या भविष्याची दिशा ठरविणारे आहे. संघर्ष की सहकार्य यातील कोणत्या गोष्टीचा स्वीकार केला जातो, त्यावर हे भवितव्य घडणार आहे.
‘लष्करी समतोल गरजेचा’
संघर्षांच्या या मुद्दय़ांना स्पर्श करताना ओबामा म्हणाले की, परस्पर सहकार्य, आंतरराष्ट्रीय कायदा व प्रथा आणि परस्पर सामंजस्य या तत्त्वांनुसार आशियातील देशांमध्ये लष्करी समतोल राहिला पाहिजे.रविवारी जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅब्बट यांच्याशी होणाऱ्या चर्चेतही या मुद्दय़ांवर ऊहापोह अपेक्षित आहे.