ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकाचा स्वित्र्झ्लडमध्ये वैद्यकीय साहाय्याने देहत्याग

जीनिव्हा : जगणे परिपूर्ण झाले असून आता मृत्यूसाठी हीच योग्य वेळ आहे, असे वाटल्यावर जीवनाचा निरोप घेण्याचा प्रत्येकाला अधिकार असला पाहिजे. मला जीवनाचा निरोप घेऊन मरणाचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे.. १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी अखेरच्या प्रवासाला निघताना पत्रकार परिषदेत हे अगदी शांतचित्ताने सांगितले.

माझ्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियातच मला मृत्यूचा असा कायदेशीर स्वीकार करता आला असता, तर आनंद वाटला असता. पण इतर अनेक देशांप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही मरणाचा स्वीकार हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे मला स्वित्र्झलडला यावे लागले, असे त्यांनी सांगितले. स्वित्र्झलडमध्ये जगण्याचा कंटाळा आलेल्या परदेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यावर जीवन संपवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी अनेक संस्थाही काम करीत असून त्यातील ‘एक्झिट इंटरनॅशनल’ या संस्थेच्या साह्य़ाने गुडॉल यांनी हा मरणोत्सव निश्चित केला होता.

काही देशांत गंभीर आजारी असलेल्या आणि ज्यांचे आयुष्य सहा महिन्यांपेक्षा अधिक उरले नसल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे त्यांना मरणाधिकार देण्यात आला आहे. गुडॉल मात्र आजारी नाहीत. तरीही जगण्याची उमेद आणि दर्जा पूर्वीसारखा उरलेला नाही. गेल्या सहा वर्षांपासून कमी दिसू लागले आहे. शारीरिक शक्तीही गेल्या एक-दोन वर्षांत घटली आहे. त्यामुळे अंताचा स्वीकार करण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे त्यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. ऑस्ट्रेलियाहून येताना वाटेत त्यांनी फ्रान्सला मुक्काम केला आणि आप्तांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

स्वित्र्झलडमध्ये १९४०पासून वैद्यकीय साह्य़ाने आत्महत्या कायदेशीर करण्यात आली आहे. माझ्या  या स्वनिर्णीत मृत्यूने जगभर नव्या चर्चेला सुरुवात होईल आणि त्यातून अनेक देश आपल्या कायद्यात दुरुस्ती करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेत त्यांनी घातलेल्या टीशर्टवरील ‘एजिंग डिसग्रेसफुली’ ही अक्षरे अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली.

मरणाआधीचे तुमचे भोजन किंवा न्याहरी काय असेल, असे विचारता ते म्हणाले की, माझा आहारच अगदी कमी झाला आहे. त्यामुळे त्याचा विचार केलेला नाही. मात्र मरणाचे स्वागत करताना बीथोवनच्या अखेरच्या सिम्फनीचे सूर कानावर पडत असावेत, असे एक स्वप्न आहे.

बीथोवनची ‘नाइन्थ सिम्फनी’ ही अखेरची सुरावट म्हणजे पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च सांगीतिक कृती मानली जातेच, पण ती पारतंत्र्याविरोधातील बंडाचे स्वागतही करणारी सुरावट मानली जाते.

गुरुवारी सकाळी साडेदहाला गुडॉल यांनी आपल्या शिरेत जाणाऱ्या सलाइनचा मार्ग मोकळा केला आणि त्यातून मृत्यूदूत असलेल्या विषारी द्रव्याला आपल्या धमन्यांमध्ये प्रवेश दिला.