प्रेमाने दिलेले आलिंगन कोणाला नको असते. प्रेमी युगुल तर बुधवारचा दिवस ‘हग डे’ म्हणून साजरा करणार. हीच संधी साधून ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘झप्पी टाइम्स’ ही नवी मोहीम आखली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाने आलिंगन द्यावे आणि आनंद साजरा करावा, हा या मागील उद्देश. या मोहिमेत अधिकाधिक भारतीय पर्यटक सहभागी होतील, अशी आशा न्यू साऊथ वेल्सच्या पर्यटन विभागाला आहे. कारण भारतीयांच्या सहभागामुळेच या मोहिमेला घसघशीत कमाई मिळत आहे.
न्यू साऊथ वेल्स या प्रांतासह हंटन व्हॅली, ब्लू माऊंटेन, सिडनी आणि साऊथ कोस्ट या प्रांतांमध्ये ‘झप्पी टाइम्स’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘‘केवळ प्रेमी युगुलच नव्हे, तर कुटुंब, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणी यांना आनंद साजरा करण्यासाठी ‘झप्पी टाइम्स’ ही एक सुवर्णसंधी आहे. सर्व एकत्र येतील आणि शहरातील वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा अनुभव घेतील. वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ आणि वाइन यांचाही आस्वाद घेतला जाईल. सोबतीला विविध खेळ आणि मौजमजा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे,’’ असे न्यू साऊथ वेल्सच्या पर्यटन विभागाने सांगितले.
गेल्या वर्षीही ‘झप्पी टाइम्स’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी न्यू साऊथ वेल्स येथे सर्वाधिक भारतीयांनी सहभाग घेतला होता. केवळ भारतीयांमुळे या मोहिमेला १८ कोटी डॉलरचा फायदा झाला होता. त्यामुळे अधिकाधिक भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाने दिली.