|| पंकज भोसले

भारतीय इतिहासाचे, फाळणीचे आणि दक्षिण आशियाई इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे अचूक संदर्भ पडताळून पाहण्यासाठी परदेशी वाचकांना रश्दींच्या कादंबऱ्या जितक्या महत्त्वपूर्ण ठरतात, त्याहून अधिक अमिताव घोष यांचे कथन-अकथनात्मक ग्रंथ मौलिक वाटतात. शाळेपासून देशातील अध्र्या इतिहासाशी परिचित असलेल्या भारतीय वाचकांना त्यांच्या जाडजूड कादंबऱ्या प्रथमदर्शनी घटनांची विस्तृत जंत्री वाटत असल्या, तरी त्या तशा नाहीत..

ज्या दशकात इकडे मराठी साहित्य प्रांगणातील वेगळ्या चुलीवर रहस्यकथेच्या शिलेदारांपैकी गुरुनाथ नाईकांचा गरुड, आत्माराम शेटय़े यांचा प्रियदर्शन, राजा पारगावकरांचा अजगर, एस.एम. काशीकर यांचा धूमकेतू हे आठवडय़ाच्या आत हजारो पुस्तकांच्या आवृत्त्या संपवण्याची लकब करून दाखवीत होते, ज्या कालावधीत बरेलीसारख्या शहरातून हिंदीमध्ये सुरेंदर मोहन पाठक यांच्या जासुसी उपन्यासांचा पाऊस देशभरातील वाचकांवर पडत होता, त्या देशी पल्प फिक्शन बहराच्या काळात १९८६ साली ‘द सर्कल ऑफ रिझन’ नावाची अमिताव घोष यांची कादंबरी इंग्रजीत दाखल झाली होती.

एका विणकरावर संशयित दहशतवाद्याचा ठपका लागल्यानंतर त्याचा कोलकात्यावरून मुंबईपर्यंत आणि मुंबईतून आखाती देशांमार्गे थेट उत्तर आफ्रिकी देशामध्ये पक्षिनिरीक्षक पोलिसाकडून पाठलाग, अशी देमारपटाला शोभेलशी कथा ‘द सर्कल ऑफ रिझन’मध्ये गुंफली आहे. उपग्रह वाहिन्यांनी आणि पुढल्या दशकांत इंटरनेटच्या चरक्यात भारतीय देशीभाषक पल्प फिक्शनाचा उत्तरोत्तर ऱ्हास होत असताना त्यातला एक धागा इंग्रजीत आपल्या पहिल्या कादंबरीतून मांडणाऱ्या अमिताव घोष यांचे शब्दधन मात्र देशविदेशात लोकप्रियतेच्या नव-नव्या शिखरांवर पोहोचत राहिले. परदेशस्थ भारतीय लेखकनामांची जागतिक पटलावर विशेषत्वाने झळकण्याची ऐंशी-नव्वदोत्तरीच्या दशकात जी साखळी तयार झाली, त्यात सलमान रश्दी आणि विक्रम सेठ यांच्यानंतर तिसऱ्या फळीतील नाव अमिताव घोष यांचे घ्यावे लागेल. तिघांच्या लेखनात भारतीय इतिहासाचा, येथील समाजकारण आणि राजकारणाचा विस्तृतपट भारतबाह्य़ त्रयस्थ वाचक नजरांसाठी तयार करण्याचा अजब हातखंडा आहे. परिणामी भारतीय वाचकांचा मोठा वर्ग त्यांच्या थोडय़ाच पुस्तकांचा आस्वादक असूनही परदेशात मात्र त्यांच्या ग्रंथांचा भारतीय लेखक म्हणून दबदबा आहे. कोलकात्यामध्ये १९५७ साली जन्मलेल्या अमिताव घोष यांचे लहानपण भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये गेले. या देशाटनातून अनुभवलेल्या स्थलांतराचा अंश त्यांच्या लेखनजाणिवा प्रखर करण्यास कारणीभूत ठरला. काही काळ पत्रकारिता आणि पुढे दिल्ली, ऑक्सफर्ड आणि अलेक्झांड्रिया विद्यापीठांतील मानववंशशास्त्रातील अध्ययनाचा परिपाक त्यांच्या लेखनाला विषय आणि ऊर्जा देणारा ठरला. दुसऱ्या कादंबरीपासून त्यांनी इतिहास आणि वर्तमानाची अद्भुत जुळवणी करायला सुरुवात केली. रश्दींच्या कादंबरीतील जादूई वास्तववादाची आणखी एक आवृत्ती त्यांच्या ‘द शॅडो लाइन्स’ कादंबरीत उतरली. लंडनमध्ये राहणाऱ्या व्यक्तिरेखेच्या निवेदनातून भारतीय इतिहासाच्या विविध लक्षवेधी कालखंडांत फिरत राहणाऱ्या या कादंबरीला साहित्य अकादमीने गौरविण्यात आले. ‘द कलकत्ता क्रोमोसोम’ ही त्यांची पुढील कादंबरी १९९० सालातील कोलकाता आणि न्यूयॉर्क शहरामध्ये घडणारी वैद्यकीय थ्रिलर म्हणून मान्यता पावली. मलेरियावरील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारे ब्रिटिश अधिकारी रोनाल्ड रॉस यांच्यावर ती बेतली असून कादंबरीसाठी त्यांनी रॉस यांच्या चरित्राचा बराचसा भाग वापरला होता. या कादंबरीनंतर घोष यांच्या कादंबऱ्यांचा आराखडा हा ऐतिहासिक दस्तावेजाचा यथोचित आधार घेत उभा राहणारा ठरला. अफुयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर ‘आयबिस’ या जहाजाभोवती घडणाऱ्या त्यांच्या कादंबरी त्रयीदरम्यान अमिताव घोष हे नाव पुरते आंतरराष्ट्रीय बनले. बुकर पुरस्कारासाठी नामांकनातून त्यांच्या पुस्तकांचा भारत आणि भारताबाहेर बोलबाला राहिला. भारतीय इतिहासाचे, फाळणीचे आणि दक्षिण आशियाई इतिहासातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे अचूक संदर्भ पडताळून पाहण्यासाठी परदेशी वाचकांना रश्दींच्या कादंबऱ्या जितक्या महत्त्वपूर्ण ठरतात, त्याहून अधिक अमिताव घोष यांचे कथन-अकथनात्मक ग्रंथ मौलिक वाटतात. शाळेपासून देशातील अध्र्या इतिहासाशी परिचित असलेल्या भारतीय वाचकांना त्यांच्या जाडजूड कादंबऱ्या प्रथमदर्शनी घटनांची विस्तृत जंत्री वाटत असल्या, तरी त्या तशा नाहीत. भारताबाहेर राहून भारताबद्दल पोकळ कळवळा व्यक्त करणाऱ्या लोकप्रिय लेखकांच्या पंगतीमध्ये बसविले जाणार नाही, अशा भूमिका पुढे त्यांनी आपल्या लेखनातून घेतल्या. ‘द ग्रेट डिरेंजमेंट- क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड द अनथिंकेबल’ या निबंधग्रंथामध्ये त्यांची पर्यावरण चिंतकाची भूमिका समोर येते. भारतात पारंपरिक शेती सोडून पैसे देणाऱ्या पिकांचा अट्टहास दुष्काळास कसा कारणीभूत ठरतो, याचे त्यांनी सोदाहरण स्पष्टीकरण दिले. दुष्काळामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी शेतीच्या पारंपरिक मार्गाकडे वळण्याचा सल्ला देत त्यांनी कार्बन वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याची गरजही विशद केली. अमेरिकेतील प्राध्यापकीसोबत काही वर्षे भारतीय इतिहासाच्या समुद्रात डुबकी मारत नवी कादंबरी उकरून काढणाऱ्या या लेखकाच्या प्रत्येक साहित्यकृतीत लोकप्रिय पल्प फिक्शनसारखी पकडून ठेवणारी हातोटी आहे. त्या हातोटीचा गांभीर्याने वापर केल्यामुळे त्यांच्या ग्रंथसंपदेचा गौरव आज सर्व खंडांत सारखाच होत आहे.

घोष यांची पुस्तके

फिक्शन

  • द सर्कल ऑफ रिझन (१९८६)
  • द शॅडो लाइन्स (१९८८)
  • द कलकत्ता क्रोमोसोम (१९९५)
  • द ग्लास पॅलेस (२०००)
  • द हंग्री टाइड (२००४)
  • सी ऑफ पॉपीज (२००८)
  • रिव्हर ऑफ स्मोक (२०११)
  • फ्लड ऑफ फायर (२०१५)

नॉन- फिक्शन

  • इन अ‍ॅन अँटिक लँड (१९९२)
  • डान्सिंग इन कंबोडिया अँड अ‍ॅट लार्ज इन बर्मा (१९९८)
  • काऊंटडाऊन (१९९९)
  • द इमाम अँड द इंडियन (२००२)
  • द ग्रेट डिरेंजमेंट : क्लायमेट चेंज अँड द अनथिंकेबल (२०१६)