साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध कादंबरीकार प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत शुक्रवारी अमिताव घोष यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

द शॅडो लाईन्स, द ग्लास पॅलेस, द हंग्री टाइड या त्यांच्या गाजलेल्या कांदबऱ्या आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या यादीत माझा समावेश होईल असे मला कधी वाटले नव्हते असे अमिताव यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

अमिताव यांचा कोलकातामध्ये १९५६ साली एका बंगाली-हिंदू कुटुंबात जन्म झाला. सध्या अमिताव न्यूयॉर्क येथे आपल्या पत्नीसोबत राहतात. दिल्ली आणि अन्य परदेशी नामांकित विद्यापीठामधून त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये काहीवर्ष वास्तव्य केले. याआधी पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.