हुकूमशाही, राष्ट्रवाद आणि बहुसंख्यांकवादानं सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती, असा दावा भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. ‘बाय मेनी अ हॅपी अॅक्सिडंट’ नावाचं अन्सारी यांचं आत्मचरित्र नुकतचं प्रकाशित झालं. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.
अन्सारी यांनी आत्मचरित्रात म्हटलं की, “२०१९च्या निवडणुकीत लोकांना दाखवलेल्या प्रलोभनांमुळे सरकारनं यश मिळालं. तसेच या निवडणुकीत हुकूमशाही, राष्ट्रवाद आणि बहुसंख्यांकवादानेही यश मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवाद आणि बहुसंख्यांकवादाचं प्रारुप कमी झाल्याचं पहायला मिळत असलं तरी असंतोष दाबण्याच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाली आहे”
अन्सारी यांनी आपल्या आत्मचरित्रात मोदींशी संबंधीत गोध्रा दंगलीबाबतही भाष्य केलं आहे. त्यांच्या पुस्तकात उल्लेख केल्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालिन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना भेटायला गेले. या भेटीदरम्यान अन्सारी यांनी मोदींना प्रश्न केला होता की, तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड का होऊ दिलं. यावर मोदींनी उत्तर देताना म्हटलं होतं की, “लोक केवळ एकच बाजू पाहतात आमच्या चांगल्या कामांकडे मात्र दुर्लक्ष करतात. आपण मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी चांगलं काम करत आहेत.” त्यावर अन्सारी यांनी म्हटलं की आपण आपल्या या कामाचा प्रचार करायला हवा. त्यावर हे माझ्या राजकारणाच्या विपरित आहे, असं उत्तर मोदींनी दिलं होतं.
हमीद अन्सारी यांनी पुस्तकात हे ही लिहिलंय की, “सर्वांना सोबत घेऊन जाणारी संस्कृती, बंधुभाव ही संविधानिक मुल्ये राजकारणातून गायब होत आहेत. तर त्याउलट चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्या आत्मचरित्रात अन्सारी यांनी राजकीय जीवन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात अनेक अनुभव शेअर केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 2:58 pm