अनेक कारप्रेमी ज्या सोहळ्याची वाट पाहात असतात त्या द्विवार्षिक ऑटो एक्स्पोला बुधवारी ग्रेटर नोएडामध्ये सुरूवात झाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ह्युंदाईने ट्युसन ही गाडी सादर केली. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) या प्रकारातील ही गाडी असून, भारतामध्ये वेगाने विस्तारात चाललेल्या मोटारींच्या क्षेत्राकडे लक्ष ठेवूनच या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेवर आपल्या गाड्यांचे वर्चस्व ठेवण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत, असे ह्युंदाई मोटार इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वाय. के. कू यांनी पत्रकारांना सांगितले. प्रत्येक वर्षामध्ये दोन नव्या गाड्या बाजारात आणण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रदर्शनामध्ये सुरुवातीचे दोन दिवस हे केवळ माध्यम प्रतिनिधी आणि व्यावसायिक प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारपासून सर्व नागरिकांना प्रदर्शन पाहता येणार आहे. पुढील आठवड्यातील मंगळवारपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि ऑटोमोटिव्ह कॉम्पोन्टंस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या दोन्ही संघटनांनी मिळून या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.