सुरेश प्रभूंचे खासदारांना आश्वासन
मुंबईत लोकलमधून पडून होणारे वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करून मेट्रोसारखे लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यास तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईतील शिवसेना-भाजप खासदारांना दिले. याशिवाय काही रेल्वे स्थानकांवर १५ डब्यांची लोकल सुरू करण्यासही प्रभू यांनी अनुकूलता दर्शवली.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आणि भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने सुरेश प्रभू यांना साकडे घातले. तातडीची उपाययोजना म्हणून १५ डब्यांची लोकल तसेच गाडय़ांना स्वयंचलित दरवाजे बसविणार असल्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले.
अलीकडेच कोपर ते दिवादरम्यान भावेश नकाते याचा, तर मंगळवारी नरेश पाटील यांचाही ठाणे ते कळवादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर भाजप खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, कपिल पाटील तर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, राजन विचारे, श्रीरंग बारणे यांनी प्रभू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई लोकलसाठी मेट्रोच्या धर्तीवर स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या प्रायोगिक प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना केल्याचे प्रभू यांनी सांगितले. आगामी वर्षभरात सर्व फलाटांची (प्लॅटफॉर्म) उंची वाढविणार, रेल्वे फलाटांभोवती कुंपण (फेन्सिंग), तसेच जास्तीत जास्त जणांना प्रवास करता यावा यासाठी काही डब्यांमधील बाके लहान करण्यात येतील, असे आश्वासन प्रभू यांनी या वेळी दिले. यासंबंधी खा. विनायक राऊत म्हणाले की, अपघात झाल्यास तातडीने मदत मिळण्याची व्यवस्था काही स्थानकांवर करणे, प्रवाशांची सुरक्षा व सुविधांची पाहणी करण्यासाठी संयुक्त समिती स्थापून महिनाभरात अहवाल तयार करणे, फलाटांची उंची वाढवणे, वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून जास्तीत जास्त लोकांना उभे राहता येण्यासाठी ५० टक्के डब्यांमध्ये बाके लहान करणे आदी मागण्यांवर प्रभू यांच्याशी चर्चा झाली. या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले आहे.