उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी अखेरचं एकदा मृतदेह पाहण्याची विनंती करुनही बळजबरीने अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे. यादरम्यान पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला होता. तसंच तिचा गळा दाबण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ‘अंतिम निदान’मध्ये बलात्कार झाला आहे याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानेच शविवच्छेदन अहवाल तयार केला आहे. उपचारासाठी पीडितेला अलिगड रुग्णालयातून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शवविच्छेदन अहवालानुसार, मणक्याला फ्रॅक्चर झाला असताना रक्तस्त्रावदेखील झाला होता.

यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अहवालात सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा जपून ठेवण्यात आलं असून इतर महत्त्वाचे नमुने तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

गळ्यावर असणाऱ्या जखमांमुळे तरुणीला अर्धांगवायूचा झटका आला आणि श्वसनात अडथळा निर्माण होत होता असा कुटुंबाचा दावा आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बलात्काराला दुजोरा देण्यासाठी आपण फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.

तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या मणक्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.