राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात रिक्षाचालकाला जय श्रीराम, मोदी जिंदाबादचे नारे द्यायची सक्ती करुन नंतर मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ५२ वर्षीय रिक्षाचालकाचं नाव गफार अहमद काचवा असं असून शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडल्यानंतर गफार अहमद यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, मारहाण करणाऱ्या दोघांनी आपलं घड्याळ आणि पैसे चोरल्याचंही गफार यांनी नमूद केलं आहे. मारहाणीत गफार यांचा दात तुटला असून त्यांचा चेहरा आणि डोळ्याला दुखापत झाली आहे.

शुक्रवारी दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान माझे काका एका प्रवाशाला जवळच्या गावात सोडून घरी येत होते. यादरम्यान कारमधून आलेल्या दोन व्यक्तींनी काकांची रिक्षा थांबवून त्यांच्याकडे तंबाखू आहे का असं विचारलं. काकांनी त्यांना तंबाखू दिला परंतू तो घ्यायला त्यांनी नकार दिला. यावेळी मोदी जिंदाबाद, जय श्रीराम असे नारे द्यायची सक्ती त्यांनी माझ्या काकांवर केली. काकांनी याला नकार दिल्यानंतर त्यांनी काकांना कानाखाली मारली.” गफार यांचा पुतण्या शाहिदने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली.

मारहाणीत गफार जखमी

 

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “दोन व्यक्तींनी मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर गफार आपली रिक्षा घेऊन सिकरच्या दिशेने निघाले. परंतू यानंतरही दोन्ही व्यक्तींनी कारमधून गफार यांचा पाठलाग करत जगमलपुराजवळ पुन्हा एकदा त्यांना गाठलं. यानंतर गफार यांना रिक्षामधून उतरवत मारहाण केली. यावेळी दोघेही आरोपी गफार यांना जय श्रीराम, मोदी जिंदाबादचे नारे लगावण्याची सक्ती करत होते. आम्हाला पाकिस्तानला पाठवल्यानंतरच आम्ही शांत बसू असंही आरोपींनी गफार यांना धमकावलं.” गफार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३२३, ३४१, २९५ अ, ५०४, ५०६, ३२७, ३८२ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र हलवत, शंभुदयाल जाट आणि राजेंद्र जाट या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत गाडी चालवत दोन्ही आरोपींनी गफार यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मारहाणीत जखमी झालेल्या गफार अहमद यांच्यावर सिकार येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.