उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ रविवारी सकाळी भयंकर घटना घडली. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळला असून, धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धरण फुटल्यानं धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्यानं नदीकाठावरील घराचं तडाखा बसला असून, अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यापार्श्वभूमीवर हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंड जिल्ह्यातील चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात रविवारी हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. जोशी मठ परिसराजवळच ही घटना घडली असून, हिमस्खलन झाल्यानं ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर गंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे.

राज्य सरकारनं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जोशी मठाजवळ एक हेलिकॉप्टर पाठवलं आहे. त्याचबरोबर केंद्राकडे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली आहे. या घटनेत पाण्यामुळे नदीकाठावरील घरांना फटका बसला असून, अनेक जण वाहून गेल्याचं वृत्त आहे.

ऋषीगंगाबरोबरच अलकनंदा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर अलकनंदा परिसरात अडकलेल्या नागरिकांनाही सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. अलकनंदा नदीला पूर येऊन नये, खबरदारीचा उपाय म्हणून भगीरथी नदीचा प्रवाह बंद करण्यात आला असून, एसडीआरएफला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी ही माहिती दिली आहे. रावत यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.