नर्ऋत्य मोसमी पावसाचे अगदी ठरलेल्या दिवशी आज १ जून रोजी, केरळच्या किनारपट्टीवर आगमन झाले असून महाराष्ट्रासह उर्वरित भारतातही मान्सून वेळेवर मार्गक्रमण करेल. यंदा मोसमी पाऊस सरासरी इतका पडेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी दिली.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी हवामान खात्याकडून दरवर्षी दोन अंदाज व्यक्त केले जातात. केरळमध्ये पाऊस दाखल होताच या वर्षांच्या पावसाळ्याचा दुसरा अंदाज हवामान खात्याने मांडला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १०२ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या अंदाजामध्ये चार टक्के कमी-अधिक फरकाची शक्यताही गृहीत धरलेली असते. एप्रिलमधील पहिल्या अंदाजामध्ये मोसमी पाऊस सरासरी एवढा (१०० टक्के) पडण्याचा अंदाज मांडलेला होता. दुसऱ्या अंदाजामध्ये दोन टक्के अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मोसमी पाऊस १५ जुलपर्यंत देशव्यापी होतो. या वर्षीही पावसाचा प्रवास विनाअडथळा होणार असून पावसाळ्याचे चारही महिने नियमित पाऊस पडेल. विशेषत: जुल आणि ऑगस्टमधील चांगला पाऊस ही खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब ठरेल.

जुलमध्ये नेहमीप्रमाणे १०३ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान असेल. ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार असले तरी ९७ टक्के पाऊस पडेल, असे भूविज्ञान मंत्री एम. राजीवन यांनी सांगितले.

शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उत्तर-पश्चिम व मध्य भारतात १०७ आणि १०३ टक्के तर, दक्षिण भारतात १०२ टक्के पाऊस पडेल. ईशान्येकडील भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ईशान्येकडे कमी पावसाची नोंद झाली आहे. या अंदाजामध्ये कमी-अधिक चार टक्क्यांचा फरक असू शकतो, असे राजीवन म्हणाले.