यंदाच्या बुकर पुरस्काराच्या लघुयादीत भारतीय वंशाच्या अवनी दोशी यांच्या ‘बर्न्ट शुगर’ या कादंबरीचा समावेश आहे. यंदा लघुयादीतील सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत.

पुरस्काराच्या लघुयादीत दोनदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या हिलरी मँटेल यांना स्थान मिळाले नाही. अवनी दोशी या अमेरिकेत जन्मल्या असून सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांची ‘बर्न्ट शुगर’ ही कादंबरी पुण्यात राहणाऱ्या आई आणि मुलीमधील संघर्षपूर्ण नातेसंबंधांची गोष्ट सांगते.

दोशी यांच्यासह डायनी कुक, ब्रॅण्डन टेलर, स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांना अंतिम यादीत स्थान मिळाले. तिस्ती नॅगरेम्बा, माझा मेंगिस्टी यांचाही त्यात समावेश आहे. स्टुअर्ट यांची शगी बेन ही कादंबरी पुरस्काराची दावेदार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात गेले कित्येक दिवस सुरू आहे. त्यात ऐंशीच्या दशकातील ग्लासगो शहरातील दारिद्रय़ाचे चित्रण आहे. ‘दी न्यू वाइल्डरनेस’ ही कुक यांची कादंबरी, अवनी दोशी यांचे ‘बन्र्ट शुगर’ हे पुस्तकही मोठय़ा चर्चेत आहेत.  मेंगिस्टी यांचे ‘दी श्ॉडो किंग’ कादंबरी इथिओपियातील समाजाचे चित्रण करते.  झिम्बाब्वेचे लेखक नॅगरेम्बा यांच्या ‘दिस मॉर्नेबल बॉडी’ या पुस्तकाने वसाहतवाद व भांडवलवादाचा वेध घेतला आहे. सध्या त्यांना झिम्बाब्वेत हरारे येथे अटकेत ठेवण्यात आले आहे, कारण त्यांनी सरकारी भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने केली होती. तेरा पुस्तकांतून ही लघुयादी तयार करण्यात आली.

वैविध्यपूर्ण..

बुकर पुरस्कार हा पन्नास हजार पौंडाचा असून तो १७ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. या वर्षीची यादी ही ५१ वर्षांच्या इतिहासात वेगळी व वैविध्यपूर्ण आहे. त्यात सहापैकी चार कादंबऱ्या या पदार्पणातील आहेत. शिवाय ब्रिटिश लेखक किंवा लेखिकेचे एकही पुस्तक त्यात नाही. या यादीतील ब्रँडन टेलर अलाबामातील माजी जैवरसायनशास्त्रज्ञ असून डग्लस स्टुअर्ट हे स्कॉटिश फॅशन डिझायनर आहेत. डायनी कुक या माजी रेडिओ निर्मात्या आहेत तर अवनी दोशी या कला इतिहासकार, तित्सी डँगरेम्बा झिम्बावेचे चित्रपट निर्माते, तर माझा मेंगिस्ती इथिओपियन लेखक आहेत.