केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये २१ नव्या मंत्र्यांचा समावेश केल्यानंतर दुसऱयाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाऱयांना सशक्त कामकाजासाठीचा कानमंत्र दिला आहे.  सुटी घेणे शक्यतो टाळा आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याची तयारी ठेवा, असा स्पष्ट संदेश मोदींनी आपल्या सहकाऱयांना देऊ केला आहे.
येत्या काही दिवसांत सुरु होणाऱया संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी तपशीलवार अभ्यास करावा आणि कामकाज कसे करावे, याच्या सुचनाही पंतप्रधानांनी दिल्या. संसदेचे अधिवेशन सुरू असताना अनावश्यक दौरे टाळा आणि संसदेत जास्तीत जास्त हजेरी लावा, असेही आदेश मोदींनी दिले आहेत. तसेच संसदेत विविध विषयांवर उपस्थित होणाऱया प्रश्नांवर अपेक्षित उत्तरे देण्यासाठी पूर्वतयारी करुनच मंत्र्यांनी संसदेत येण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे.  
मोदी स्वत: अथत काम करण्याचे मूल्य पाळत असून गेल्या सहा महिन्यांमध्ये पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम किंवा बैठका या सार्वजनिक सुटी अथवा रविवारी सुटीच्या दिवशी घेतल्या आहेत.