करोना विषाणूमुळे भारतात सध्या गंभीर वातावरण आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, जयपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. प्रत्येक शहरातील रुग्णालयांतले डॉक्टर अविरत काम करत आहेत. गुरुग्राममधील Medanta Hospital मधील ४२ वर्षीय डॉक्टर सुशीला कटारिया या गेले काही दिवस आपल्या परिवारापासून दूर राहत आपलं कर्तव्य बजावत आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात इटलीतील १४ परदेशी नागरिकांना दाखल करण्यात आलं होतं, या नागरिकांच्या तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी डॉ. कटारिया यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आपल्या या अनुभवाबद्दल डॉ. कटारिया यांनी द संडे एक्स्प्रेसला माहिती दिली.

“इटलीचे १४ प्रवासी हॉस्पिटलमध्ये येत आहेत, असं समजल्यानंतर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था…नर्स आणि इतर स्टाफला त्यांची काळजी कशी घ्यायची हे समजावून सांगण्यासाठी बराच वेळ गेला. संध्याकाळी सहा वाजता सर्व रुग्ण हॉस्पिटलमध्ये आले. साहजिकच सर्वांमध्ये थोडं भीतीचं वातावरण होतं. महत्वाची गोष्ट फक्त दोघांना इंग्लिश समजत होतं. त्यांना थोडासा धीर दिल्यानंतर सर्वात आधी, त्यांनी घरच्यांशी संपर्क साधण्याची मागणी केली. डॉक्टर म्हणून आमच्यासाठी देखील ही परिस्थिती नवीनच आहे. पण वैद्यकीय सेवेत असताना मी कोणत्याही कामाला नाही म्हणून शकत नाही. लोकांची सेवा करणं हे माझं काम आहे.” डॉ. कटारिया आपल्या अनुभवाबद्दल बोलत होत्या.

गेले १७ दिवस डॉ. कटारिया हॉस्पिटलमध्येच आहेत. “परदेशी रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत असल्याचं समजताच मी माझ्या पतीला फोन करुन कल्पना दिली. त्यांची तब्येतही बरी नसल्यामुळे त्यांना एका वेगळ्या जागेवर हलवण्यात आलं होतं. पण त्या परिस्थितीतही त्यांनी मला पाठींबा दिला. आमची अजुनही भेट झालेली नाही. दिवसांत जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा आम्ही फोन किंवा व्हॉट्स अपवर बोलत असतो.” आपल्या पतीच्या तब्येतीबद्दल बोलताना डॉ. कटारिया भावूक झाल्या होत्या. डॉ. कटारिया यांचा १६ वर्षाचा मुलगा आणि १३ वर्षाची मुलगी हे त्यांच्यासोबतच राहत आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलंय. “आम्ही फक्त जेवताना एकत्र येतो, पण सध्याच्या परिस्थितीत मी त्यांना भेटू शकत नाही. बरेच दिवस झाले मी माझ्या मुलांना मिठी मारु शकले नाहीये. त्यांच्या खोलीच्या दारालाही मला स्पर्श करता येत नाहीये. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर नेहमी हा प्रश्न असतो की, आई हे सगळं तु का करतेयस?? पण सध्या तरी याचं उत्तर माझ्याकडे नाही…”

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका इटालियन नागरिकाची तब्येत सुधारल्यामुळे त्याला सोडून देण्यात आलेलं आहे. इतर १३ जणांनाही करोनाची लागण झालेली नसल्याचं समजतंय. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. करोनामुळे सध्या देशात भीतीचं वातावरण असलं तरीही डॉ. सुशिला कटारिया आणि त्यांच्यासारख्या अनेक डॉक्टरांचं काम हे दाद देण्यासारखं आहे.