विरोधकांच्या एकजुटीमुळे २०१९ची निवडणूक जिंकणे तर दूरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाराणसी मतदारसंघातही हारतील, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधानांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी तिसरी आघाडी होईल की नाही याबाबत शंकाही उपस्थित केली.

राहुल गांधी म्हणाले, २०१९च्या निवडणुकीबाबत मला २ गोष्टी महत्वाच्या वाटतात. एकदा विरोधीपक्षांचे संघटन एका ठराविक वेळेला मजबूत झाले तर त्यांच्यासाठी निवडणूक लढवणे कठीण होऊल जाईल. उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूत विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे पाहता हे शक्य होईल असे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरयाणाही आम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेऊ असेही यावेळी ते म्हणाले. दरम्यान, कर्नाटकात १२ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी सहाव्यांदा कर्नाटकच्या दौऱ्यावर आले आहेत, यावेळी ते बोलत होते.

राहुल पुढे म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागण्यांबाबत आम्ही त्यांना सांभाळून घेऊ. काँग्रेसमध्ये लोकांना सांभाळून घेतले जाते हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही घमेंडखोर लोक नाही आहोत. आम्ही लोकांवर दबाव टाकत नाही तसेच त्यांचे जीवन उध्वस्तही करीत नाही. त्यामुळे आम्ही हे सर्व सांभाळून घेऊ शकतो. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मोदी आणि रा. स्व. संघाने देशाला ज्या खाईत लोटले आहे त्यातून देश बाहेर कसा काढावा हे महत्वाचे ठरणार आहे.

राहुल गांधी म्हणाले की, जर त्यांचा पक्ष केंद्रात सत्तेत आला तर आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना सन्मान कसा द्यायला हवा, हे कर्नाटकपासून शिकू. कर्नाटक दौऱ्यादरम्यान ते सफाई कर्चमाऱ्यांशी संवाद साधत होते.