गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अहमदाबादर येथील एका २३ वर्षीय तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आत्महत्या करण्याआधी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्य आणि मनातलं दु:ख पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. आयेशा असं या तरुणीचं नाव असून व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर साबरमती नदीत उडी मारुन तिने आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान आयेशा आणि पती आरिफमध्ये झालेलं ७० मिनिटांचं संभाषण पोलिसांच्या हाती लागलं आहे ज्यामध्ये आरिफ ‘जा मर आणि त्याआधी मला व्हिडीओ पाठव’ असं सांगताना ऐकू येत आहे.

पोलिसांनी आरिफचा मोबाइल जप्त केला आहे ज्यावरुन त्याने आयेशासोबत शेवटचा संवाद साधला होता. २५ फेब्रुवारीला आयेशाने व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्यानंतर राजस्थानचा रहिवासी असणाऱ्या आरिफला पाली येथून अटक करण्यात आली. आरिफचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आयेशाच्या कुटुंबाचा आरोप आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

‘कुठे चूक झाली अल्लाहला विचारेन’; २३ वर्षीय तरुणीची साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या; व्हिडीओमुळे खळबळ

आरिफ विवाहबाह्य संबंधामुंळेच हुंड्यासाठी आयेशाचा छळ करत होता का याचाही पोलीस तपास करत आहेत. आयेशाने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार केली होती. २०२० मध्ये पती आरिफ आणि सासरच्या कुटुंबाविरोधात अहमदाबादमधील पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली होती.

आयेशाचे वडील लियाकत अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयेशाचा २०१८ मध्ये राजस्थानमधील आरिफ खानसोबत विवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंडा मागण्यास सुरुवात केली होती. मी त्यांना काही पैसे दिले होते, पण त्यांच्या मागण्या संपत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी भांडणानंतर आरिफने आयेशाला घरी पाठवलं. त्याने तिच्याशी फोनवरुन बोलणंही बंद केलं होतं. या वेदना सहन होत नसल्यानेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला”.

आरिफ आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर त्यांची जामीनावर सुटका केली. पोलिसांनी आयेशा आणि आरिफमध्ये झालेल्या ७० मिनिटांचं कॉल रेकॉर्डिंग मिळवलं असून यामध्ये ते हुंड्यासंबंधीदेखील बोलताना दिसत आहेत. आरिफ आयेशावर कुटुंबाला अनेकदा त्रास दिल्याचा आरोप करत असून हुंड्याची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता.
पोलीस सध्या आयेशा आणि आरिफच्या मोबाइलमधून अजून पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान कॉल रेकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली असून कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाणार आहे.

आयेशाने व्हिडीओत काय सांगितलं-
“मी जे काही करण्यासाठी जात आहे त्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. देवानेच आपल्याला इतकंच आयुष्य दिलं होतं असं समजा. पप्पा अजून किती तुम्ही लढा देणार आहात? केस मागे घ्या…आयेशा लढण्यासाठी नाही. मी आरिफवर प्रेम करते…तर मग त्याला त्रास का देईन? जर त्याला स्वातंत्र्य हवं असेल तर मग त्याला मोकळं केलं पाहिजे. असंही माझं आयुष्य इथे संपत आहे. अल्लाहशी माझी भेट होणार याचा आनंद आहे. माझी कुठे चूक झाली अल्लाहला विचारेन. माझ्यामध्ये काय दोष आहे?,” असं आयेशा बोलताना दिसत आहे.

व्हिडीओच्या शेवटी आयेशा म्हणत आहे की, “ही सुंदर नदी…ही मला सामावून घेईल अशी प्रार्थना करते. मी हवेप्रमाणे आहे, मला सतत वाहायचं आहे”.