News Flash

Ayesha suicide : …तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत; ओवेसी संतापले

"आपण अजून किती महिलांचा जीव घेणार आहोत?"

संग्रहित छायाचित्र

पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आयेशा नावाच्या तरुणीने अहमदाबादमधील साबरमती नदीत उडी घेत जीवन संपवलं. आत्महत्येआधी तिने आपल्या फोनवर व्हिडीओ शूट केला होता. आयेशाच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर तिला झालेल्या त्रासावरून अनेकांनी संतापही व्यक्त केला. आयेशाला घ्याव्या लागलेल्या टोकाच्या निर्णयावरुन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी हे तिच्या सासरच्या मंडळीवर भडकले. तीव्र शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “आपण कोणत्याही धर्मातील असलात तरी हुंड्याचे लोभ दूर करा असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो, असंही ओवेसी म्हणाले.

ओवेसी यांनी एका सभेत बोलताना आयेशाच्या मृत्यूवर खंत व्यक्त केली. ते म्हणाले,”अहमदाबादमध्ये एका मुस्लीम तरुणीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, धर्म काहीही असो, हुंड्याचा लोभ संपवा. आपण पुरुष असाल, पण आपल्या पत्नीचा छळ करणं हा मर्दपणा नाही. बायकोला मारहाण करणे म्हणजे पुरुषत्व नाही. बायकोकडे पैसे मागणे हे पुरुषत्व नाही. जर तुम्ही असे कृत्य करत असाल, तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत,” अशा शब्दात ओवेसी यांनी आपला संताप व्यक्त केला.

आणखी वाचा- ‘कुठे चूक झाली अल्लाहला विचारेन’; २३ वर्षीय तरुणीची साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या; व्हिडीओमुळे खळबळ

“त्याने (आयशाचा नवरा) निर्दोष मुलीचा छळ केला. त्या त्रासाला कंटाळून तिनं मोठं पाऊल उचललं. एका निरागस मुलीसोबत असं करताना अशा लोकांना लाज वाटायला हवी. मी अल्लाहकडे प्रार्थना करीन की अल्लाह तुमचं वाटोळं करो. प्रत्येक बापाचं दुःख तुम्ही समजू शकत नाहीत. मला असे बरेच बाप माहित आहेत, जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माझा हात धरतात आणि म्हणतात की असदसाहेब मुलीच्या लग्नाची काही व्यवस्था करा. मरण्याअगोरद काहीतरी घडू द्या,” असं ओवेसी म्हणाले.

“काय झालंय या लोकांना?, आपण अजून किती महिलांचा जीव घेणार आहोत?, तुम्ही कसले मर्द आहात?, जे महिलांना मारतात. तुमच्यातील माणुसकी मेली आहे का? असे किती लोक आहेत जे आपल्या पत्नीवर अत्याचार करतात? हुंड्यासाठी गर्भवती महिलांना मारहाण करत घराबाहेर काढतात आणि स्वतःला मोठा देवदूत समजतात. लक्षात ठेवा, आपण जगाला फसवू शकता आणि अल्लाहला नाही. हे लक्षात असुद्या तुम्ही जगाला धोका देऊ शकता अल्लाह नाही. अल्लाह सगळं पाहतोय. तो पीडित व्यक्तीला नक्कीच बळ देईल. अल्लाह रसूल सल्लल्लाहू अलैहि वसल्लम (प्रेषित मोहम्मद)च्या त्या सर्व मुस्लिमांना मी आवाहन करतो आहे की, आपल्यात सर्वांत चांगला तो आहे, जो आपल्या कुटुंबाशी चांगला वागतो. सर्वोत्कृष्ट अखलाक (चरित्र) ते आहे जो आपल्या पत्नीशी चांगला वागतो,” असं ओवेसी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 8:28 am

Web Title: ayesha suicide case asaduddin owaisi emotional on incident bmh 90
Next Stories
1 पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश
2 दिल्ली महापालिका पोटनिवडणुकीत पाचही जागांवर भाजप पराभूत
3 सरकार विरोध देशद्रोह नव्हे!
Just Now!
X