अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, यासाठी अयोध्येतील भूमिपूजनाची तयारीदेखील पूर्ण झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराचा आणि आसपासचा परिसरही मोठ्या प्रमाणात सजवण्यात आला आहे. तसंच सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. सध्या देशात करोना विषाणूनं थैमान घातलंय. अशा परिस्थितीत करोनाच्या दृष्टीनंही आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

बुधवारी दुपारी १२ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वीच सर्व आमंत्रित पाहुणे आज अयोध्येत पोहोचणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आज संध्याकाळपासून अयोध्या सील करण्यात येईल. श्रीराम मंदिराच्या ट्रस्टकडून एकूण १७५ जणांना भूमिपूजनाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी देशातील निरनिराळ्या भागातील संतांचा समावेश आहे. दरम्यान, देण्यात आलेल्या प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरत्षेच्या कारणास्तव तो कोड तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मोहन भागवत, इक्बाल अन्सारी येणार

मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. इक्बाल अन्सारी हे भूमिपूजनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागतंही करतील. याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत विशेष अतिथी म्हणून दाखल होणार आहेत. तर दुसरीकडे अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

करोनामुळे दिग्गज राहणार अनुपस्थित

करोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे काही दिग्गज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही नेते या कार्यक्रमाला येणार नाही. या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीही व्यवस्था केली जात आहे. या व्यतिरिक्त कल्याण सिंह, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हेदेखील उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.