बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडदा पडला. सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले होते. तर बाबरी मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. राम मंदिराच्या कामाचं काही महिन्यांपूर्वी बाबरी मशिदीच्या कामालाही लवकरच सुरूवात होणार आहे. पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचं डिझाईनही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने शनिवारी अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे संकल्पचित्र प्रसिद्ध केलं. अयोध्येपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावात मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यात आलेली आहे. मशिदीचे भव्यदिव्य संकल्पचित्र फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून, मशिदीबरोबरच एक रुग्णालयाही उभारण्यात येणार आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागातील(स्थापत्य कला) प्रा. एस. एम. अख्तर यांनी मशिदीचे संकल्पचित्र तयार केलं आहे. तयार करण्यात आलेल्या आरेखनाला संबंधित विभागाकडून वेळेत आवश्यक परवानग्या मिळाल्या, तर २६ जानेवारीपासून काम सुरू होऊ शकतं. मात्र, जर वेळेत परवानग्या मिळाल्या नाही, तर २६ जानेवारी ऐवजी दुसरी तारीख ठरवली जाईल, अशी माहिती ट्रस्टने दिली आहे.

मशिदीच्या शेजारीच रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं ट्रस्टनं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. या पाच एकर जागेवर इंडो-इस्लामिक कल्चर संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर), धर्मदाय रुग्णालय, कम्युनिटी किचन, संग्रहालय आणि सार्वजनिक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. “मशिदीचे नाव अजून निश्चित करण्यात आलेलं नाही. या मशिदीला कोणत्याही सम्राट वा राजाचं नाव दिलं जाणार नाही. या मशिदीचे डिझाईन करताना जगभरातील मशिदींचे डिझाईन्स बघण्यात आले होते. जगभरातील मशिदींतील आधुनिक सुविधा लक्षात घेऊन हे डिझाईन तयार करण्यात आलं आहे,” अशी माहितीट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी दिली.