अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात जमियत उलेमा ए हिंदने फेरविचार याचिका दाखल केली आहे. बहुसंख्य मुस्लिम हे फेरविचार याचिका दाखल करावी या मताचे आहेत असे जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी सांगितले.
न्यायालयानेच आम्हाला फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला आहे असे मदानी म्हणाले. जमियत प्रमाणेच अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळही लवकरच फेरविचार याचिका दाखल करणार आहे.
आम्ही आजच फेरविचार याचिका दाखल करणार नाही. आम्ही आमची फेरविचार याचिका तयार केली आहे. ९ डिसेंबरपूर्वी आम्ही केव्हाही याचिका दाखल करु असे अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाचे जफरयाब जिलानी यांनी सांगितले.
मशिदीची जमीन अल्लाहच्या मालकीची आणि शरीयाच्या अधिपत्याखाली असल्याने ती कोणालाही दिली जाऊ शकत नाही, असे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस जफरयाब जिलानी यांनी मागच्या महिन्यात बोर्डाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले होते. अयोध्येत मशिदीच्या बदल्यात पर्यायी जागा स्वीकारण्यास बोर्डाचा तीव्र विरोध आहे, असे जिलानी म्हणाले होते.
जमैत उलमा-ए-हिंद या संघटनेने सुद्धा फेरविचार याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते. मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जमीन स्वीकारण्यासही विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 3:39 pm