15 October 2018

News Flash

अयोध्या प्रकरण: आधी नीट माहिती घ्या, मगच बोला; कपिल सिब्बल यांचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान मोदींनी सिब्बल यांच्यासह काँग्रेसवर टीका केली होती

kapil sibal: उत्तर प्रदेशमधील उन्नाव आणि जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

वादग्रस्त राम मंदिर प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मोदींना अर्धवट माहिती घेऊन बोलण्याची सवय आहे. त्यांनी आधी प्रकरणाची संपूर्ण माहिती घ्यावी आणि मगच बोलावे,’ अशा शब्दांमध्ये सिब्बल यांनी मोदींवर पलटवार केला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू मांडली. मात्र त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे खुद्द सुन्नी वक्फ बोर्डाने न्यायालयाला सांगितले,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी सिब्बल यांना लक्ष्य केले होते. काँग्रेसकडून राम मंदिराचा संबंध राम मंदिराशी जोडला जात असल्याचेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या टीकेला सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी कधीही सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडलेली नाही,’ असे सिब्बल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. या प्रकरणातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांची बाजू मी न्यायालयात मांडत असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘पंतप्रधानांना या प्रकरणातील कोणतीही माहिती नाही. मी कधीही सर्वोच्च न्यायालयात सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू मांडलेली नाही. मात्र तरीही त्यांनी यावर भाष्य करत सुन्नी वक्फ बोर्डाचे आभार मानले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मोदी आणि अमित शहांनी काळजी घ्यावी,’ असे आवाहन सिब्बल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले. ‘मंदिर देवाच्या मर्जीनेच उभे राहिले. ते मोदींच्या मर्जीने उभारले जाणार नाही,’ असेही ते म्हणाले

गुरुवारी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला राम मंदिर प्रकरणाची सुनावणी जुलै २०१९ नंतर घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. राम मंदिर प्रकरणातील निकालाचे मोठे परिणाम देशातील राजकीय स्थितीवर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते. सिब्बल यांच्या विधानावर भाष्य करताना, काँग्रेसकडून राम मंदिराचा संबंध निवडणुकीशी जोडला जात असल्याचे मोदींनी गुजरातमधील जनसभेला संबोधित करताना म्हटले. मात्र आपण न्यायालयाकडे केवळ सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यात निवडणुकीचा उल्लेख नव्हता, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले. मात्र सिब्बल यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.

First Published on December 6, 2017 10:48 pm

Web Title: ayodhya dispute pm modi should get facts right says kapil sibal