अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मुस्लिमांनी नमाज पठण केलं असेल, पण यामुळे त्या जागेवर दावा करण्याचा हक्क त्यांना मिळत नाही. खासकरुन रचना, खांब, आकृतिबंध आणि शिलालेख या सर्व गोष्टी हिंदू असल्याचं सिद्ध करत असताना हा हक्क त्यांना मिळत नसल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे. ‘राम लल्ला विराजमान’ची बाजू सर्वोच्च न्ययाालयात मांडणारे ज्येष्ठ वकील सी एस वैद्यनाथन यांनी हा युक्तिवाद केला आहे.

“मुस्लीम रस्त्यावर नमाज पठण करत असतील म्हणून काही त्यांना त्या जागेवर मालकी हक्काचा दावा करण्याचा अधिकार मिळत नाही”, असा युक्तिवाद सी एस वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केला आहे.

वैद्यनाथन यांनी खंडपीठाला अयोध्येतील वादग्रस्त जागेची रचना कोणत्याही अर्थाने मशिदीची नव्हती असंही सांगितलं आहे. “बाबरीमध्ये असणारे फोटो हे इस्लामिक विचारसणीला विरोधाभास करणारे आहेत. इस्लाममध्ये कधीही त्यांच्या प्रार्थनास्थळी कोणत्याही व्यक्ती किंवा प्राण्याचा फोटो नसतो”, अशी माहिती वैद्यनाथन यांनी खंडपीठाला दिली. यावेळी त्यांनी १९९० मध्ये घेण्यात आलेले फोटो खंडपीठासमोर सादर केले.

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आठवड्याच्या पाचही दिवस सुनावणी सुरु आहे. वैद्यनाथन यांनी गेल्या सुनावणींमध्ये बाबरी मधील मंदिराच्या अवशेषांवर उभी करण्यात आली होती, त्यामुळे ही जमीन कोणाच्या मालकीची आहे असा दावा करणं चूक ठरेल असा युक्तिवाद केला होता. “जर मंदिराच्या अवशेषांवर उभी राहिली असेल, तर ती मशीद असू शकत नाही. कारण हे शरियत कायद्याच्या विरोधात आहे”, असंही वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.