उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतील रामलल्लाच्या अस्थायी मंदिराच्या पुजाऱ्यांसह आठ अन्य कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात वाढ केली आहे. अनेक दिवसांपासून यासाठी मागणी करण्यात आलेली होती. अयोध्येच्या विभागीय आयुक्तांकडून या वार्षिक भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मंदीराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी नऊ कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमधील अपुऱ्या वार्षिक वाढीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी विभागीय आयुक्तांची भेट घेतली होती. पुजारी व कर्मचारी यांच्याखेरीज बाल्यावस्थेत असलेल्या रामलल्लांच्या नावेही प्रसाद, पाणी, वीज व अन्य देखभालीच्या खर्चापोटी दर महिन्याला पगार देण्यात येतो त्यातही वाढ करण्यात आली आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

बाबरी मशिद पाडल्यानंतर १९९२ पासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून पुजारी व अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांनी मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना त्यांच्या वार्षिक भत्त्यात वाढीचे आश्वासन दिले होते. ज्यानुसार मुख्य पुजाऱ्यांच्या भत्त्यात एक हजार रुपये प्रति महिन्याची वाढ करण्यात आली. तर उर्वरीत अन्य आठ कर्मचाऱ्यांना ५०० रुपये प्रतिमहिना वाढ देण्यात आली. आता मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांना १३ हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन ७ हजार ५०० रुपये ते १० हजार रुपयांदरम्यान असणार आहे.

विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांनी सांगितले की, रामलल्लाच्या नावे मिळणारी रक्कम २६ हजार २०० रुपयांवरून वाढवून ३० हजार रुपये प्रतिमहिना करण्यात आली आहे. १९९२ मध्ये मुख्य पुजाऱ्याचे वेतन १५० रुपये होते. ते वाढत गेले व नंतर ऑगस्ट २०१७ मध्ये मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांना ८ हजार ४८० रुपये वेतन दिले जात होते. दैनंदिन खर्चांचा विचार करता आमच्या भत्त्यात थोडीफार जरी वाढ झाली तरी ती आमच्यासाठी समाधानाची बाब असेल असे दास यांनी म्हटले होते. “त्यादृष्टीनं आम्ही या वर्षी जुलै महिन्यात सरकारकडे यासाठी निवेदन सादर केले होते. पाच दिवस अगोदरच सरकारकडून वेतनात वाढ करण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली. ११९२ पासून ते आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे,” दास यांनी सांगितले.