सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षेतेखाली याचिकांवर सुनावणी झाली. बुधवारी सकाळपासून दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तिवाद सुरू होता. पाच वाजेपर्यंत न्यायालयात सुनावणी चालणार होती. मात्र, चार वाजताच सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी २३ दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे राम मंदिर आणि बाबरीचा वाद?

अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्याची धारणा आहे

१५ व्या शतकात प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं गेलं असाही आरोप आहे

१५ व्या शतकात मंदिर पाडून त्याजागी बाबरी मशीद उभारली गेली असाही आरोप आहे

१८५३ मध्ये हिंदू संघटनांनी हा आरोप केला की राम मंदिर पाडून या ठिकाणी मशीद उभारली आहे. या आरोपावरुन पहिल्यांदा देशात हिंदू मुस्लीम दंगलही झाली

१८५९ मध्ये ब्रिटिशांनी वादग्रस्त जागेवर तारांचे कुंपण घालून, या कुंपणाबाहेर आणि आतमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना वेगवेळी प्रार्थना करण्याची मुभा दिली

१८८५ मध्ये पहिल्यांदा हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहचलं. महंत रघुबरदास यांनी फैजाबाद येथील न्यायालयात राम मंदिराच्या निर्मितीसाठी अपिल केलं

२३ डिसेंबर १९४९ : जवळपास ५० हिंदूनी मशिदीच्या केंद्रस्थानी प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवली, ज्यानंतर हिंदू बांधव पूजा करु लागले मात्र मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करणं बंद केलं

१६ जानेवारी १९५० : गोपाल सिंह विशारद यांनी फैजाबाद न्यायालयात अपील करुन रामलल्लाच्या पूजेसाठी विशेष परवानगी मागितली

५ डिसेंबर १९५० : महंत रामचंद्र दास यांनी हिंदूंनी प्रार्थना सुरु ठेवावी यासाठी आणि मशिदीत रामाची मूर्ती ठेवण्यासाठी तक्रार दाखल केली, यावेळी मशिदीला पहिल्यांदाच ‘ढाँचा’ असा शब्द वापरण्यात आला

१७ डिसेंबर १९५९ : निर्मोही आखाड्याने वादग्रस्त जागा मिळावी म्हणून कोर्टात धाव घेतली

१८ डिसेंबर १९५९ : उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने मशिदीचा मालकी हक्क मिळावा म्हणून कोर्टात धाव घेतली

१९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीचं कुलुप उघडण्यासंदर्भात आणि रामजन्मभूमीची जागा स्वतंत्र करण्यासाठी एक मोहीम सुरु केली. या जागेवर एक भव्य मंदिर उभारले जाईल ही घोषणा तेव्हाच देण्यात आली

१९८६ मध्ये फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी वादग्रस्त जागेवर हिंदू बांधवांना पूजेची संमती दिली, कुलुपं उघडण्यात आली मात्र मुस्लीम बांधवांनी बाबरी मशीद अॅक्शन कमिटीची स्थापना केली

१९८९ मध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणजेच भाजपाने विहिंपच्या भूमिकेला औपचारिकरित्या पाठिंबा दिला, ज्यामुळे मंदिराचे थंडावलेले आंदोलन जोषात सुरु झाले

जुलै १९८९ मध्ये या प्रकरणातला पाचवा खटला दाखल करण्यात आला

१९९० मध्ये भाजपाचे अध्यक्ष असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून उत्तरप्रदेशातल्या अयोध्येपर्यंत एक रथयात्रा काढली, ज्यानंतर दंगली उसळल्या

१९९० मध्ये आडवाणींना समस्तीपूरमधून अटक करण्यात आली, ज्यानंतर भाजपाने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढला

ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकारने बाबरी मशिदीच्या शेजारी असलेल्या २.७७ एकर जमिनीचा ताबा घेतला

६ डिसेंबर १९९२ हजारो कारसेवकांनी अयोध्येत पोहचत बाबरी मशिद पाडली, ज्यानंतर जातीय दंगली उसळल्या, घाईने तात्पुरत्या स्वरुपाचे एक मंदिर तयार करण्यात आले

१९९२ पासून हे प्रकरण प्रलंबितच आहे. आता नियमित सुनावणी होणार असल्याने हा वाद लवकरात लवकर मिटेल अशी अपेक्षा आहे.

Live Blog

Highlights

    16:07 (IST)16 Oct 2019
    एक तास आधीच युक्तिवाद पूर्ण

    राममंदिर प्रकरणी एक तास आधीच युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे

    15:08 (IST)16 Oct 2019
    सरन्यायाधीशांच्या परवानगीनंच पानं फाडली : धवन



    हिंदू महासभेने न्यायालयात राम जन्मभूमीचा नकाशा दाखवला होता. पंरतु मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी तो नकाशा फाडल्याची माहिती समोर आली होती. 'मला ती पानं दूर फेकायची होती. परंतु मुख्य न्यायाधीशांनी ती पान फाडण्यास सांगितलं. त्यानंतर ती पानं फाडली' असल्याचं स्पष्टीकरण धवन यांनी दिलं.






     
    14:20 (IST)16 Oct 2019
    दिवाळीमध्ये अयोध्येत पूजा अर्चा करण्याची परवानगी द्या - हिंदू संत

    दिवाळीमध्ये रामजन्मभूमीच्या जागी प्रार्थना, पूजा अर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे हिंदू संतांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेतेही विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांना भेटले असून त्यांनी हिंदू संतांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. हिंदूंना अशी परवानगी दिली तर आम्ही पण तिथं नमाज पढू असा इशारा बाबरी कृती समितीनं दिला आहे.

    14:19 (IST)16 Oct 2019
    उत्तर प्रदेशात सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

    राम मंदिर प्रकरणाच्या सुनावणीकडे पाहता उत्तर प्रदेश सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्ती पूर्वी याप्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

    14:17 (IST)16 Oct 2019
    सुन्नी वक्फ बोर्डाचा या जागेशी काही संबंधच नाही - शिया वक्फ बोर्ड

    जागेच्या मालकिविषयी वाद असलाच तर शिया व सुन्नी वक्फ बोर्डामध्ये असायला हवा, पण या प्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाचा ताही संबंधच नसल्याचा दावा शिया वक्फ बोर्डाच्या वकिलांनी केला आहे. हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या युक्तीवादानंतर शियांच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला.

    13:09 (IST)16 Oct 2019
    जेवणानंतर पु्न्हा सुनावणी

    अयोध्या प्रकरणी सुनावणीचा आज अखेरचा दिवस आहे. यापुढे आणखी वेळ वाढवून दिली जाणार नसल्याचं रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या दुपारच्या जेवणासाठी सुनावणी थांबवण्यात आली असून जेवणानंतर पुन्हा युक्तीवाद सुरू करण्यात येणार आहे.

    13:01 (IST)16 Oct 2019
    अन्य जागा घेण्यास सुन्नी वक्फ बोर्डाची तयारी?

    सुन्नी वक्फ बोर्ड अन्य जागा घेण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. तसच मध्यस्थींचा अहवालही न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. वादग्रस्त जागा सोडून अन्य ठिकाणी जागा घेण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे.

    12:48 (IST)16 Oct 2019
    युक्तीवादासाठी दोन्ही पक्षांना ४५ मिनिटं

    युक्तीवादासाठी दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४५ मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. तर मुस्लीम पक्षकारांना त्यावर आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक तास देण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हिंदू पक्षकारांनी राम जन्मस्थानावर मशिद उभारून बाबरनं ऐतिहासिक चूक केली असल्याचं म्हटलं होतं. तसंच ती चूक सुधारण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले होते.

    12:43 (IST)16 Oct 2019
    पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी

    अयोध्या प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. यामध्ये न्यायमूर्ती एस.ए.बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नाझीर यांचा समावेश आहे.

    12:37 (IST)16 Oct 2019
    मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांनी नकाशा फाडला

    हिंदू महासभेने न्यायालयात राम जन्मभूमीचा नकाशा दाखवला होता. पंरतु मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी तो नकाशा फाडल्याची माहिती समोर आली आहे.

    मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
    Web Title: Ayodhya ram mandir babari masjid case cji ranjan gogoi supreme court live updates jud
    First published on: 16-10-2019 at 12:34 IST