मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रामविलास वेदांती यांनी केंद्र सरकारच्या चौथ्या टप्प्यात अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरु होईल असा दावा केला आहे. रामविलास वेदांती यांनी सांगितलं आहे की, ‘केंद्र सरकार २०२० मध्ये राज्यसभेत बहुमत मिळाल्यानंतर सर्वात प्रथम काश्मीमधून कलम ३७० रद्द करेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कलम ३५अ संपवेल आणि तिसऱ्या टप्प्यात राम जन्मभूमी न्यासाकडे परत वर्ग करेल’.

रामविलास वेदांती यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने आधीच सर्वोच्च न्यायालयात जमीन परत करण्यासंबंधी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. वेदांती यांनी दावा केला आहे की, ‘जमीन मिळाल्यानंतर चौथ्या टप्प्यात २०२४ मध्ये केंद्र सरकार राम मंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल’.

फक्त नरेंद्र मोदीच करु शकतात हे काम –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिरासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर आमच्या आशा कायम आहेत. हिंदुत्व भावनेचं रक्षण होईल आणि लवकरच राम मंदिर उभारण्याचं काम सुर होईल असा संतांना विश्वास आहे. हे काम फक्त पंतप्रधान नरेद्र मोदीच करु शकतात असं वेदांती यांनी सांगितलं आहे.