भाजपाचे ज्येष्ठ नेते व राम जन्मभूमी आंदोलनातील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळख असणारे लालकृष्ण आडवाणी यांनी आज राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.

”सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने अयोध्याप्रकरणी दिलेल्या ऐतिहासीक निर्णयाचे मनापासून स्वागत करण्यात मी देशवासीयांबरोबर आहे. हा क्षण माझ्यासाठी पूर्णत्वाचा आहे.  मला या जन आंदोलनात माझे नम्र योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. भारतीय स्वतंत्रता आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन होते, असे आडवाणी यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने  निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं  सर्वोच्च न्यायालयाने  आहे.