अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी दावा केल्याप्रमाणे मिक्सोपॅथी अशी कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही, पण आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके प्रशिक्षित आहेत, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

आयुर्वेद डॉक्टरांना वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, की आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके प्रशिक्षित आहेत. ते अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना मदत करू शकतात. नाईक यांना अपघातानंतर गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून सोडण्यात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेस परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)  केलेल्या टीकेवर त्यांनी सांगितले, की भारतीय वैद्यकीय उपचार पद्धती ही अ‍ॅलोपथीच्या मदतीसाठी वापरली जात आहे. दोन्ही पद्धतीत स्पर्धा निर्माण करण्याचा सरकारचा हेतू नाही. या दोन्ही उपचार पद्धती एकमेकांना पूरक आहेत. आयुर्वेदाचे डॉक्टरही शिकलेले आहेत. त्यांना शाल्यक शाखेत शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिलेले असते. अभ्यास पूर्ण केल्यानंतर आयुर्वेदाचे डॉक्टर एक वर्ष आंतरवासीयता करतील व त्यांना शस्त्रक्रिया करण्यातील आणखी सखोल बाबी समजतील. भारतीय उपचार पद्धती अनेक शतकांपासून लोकांपुढे आहे. त्याचे सूत्र तेव्हापासून बदललेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

देशातील अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयाला विरोध केला होता. केंद्राने या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी दिली असली तरी त्या शस्त्रक्रिया काही विशिष्ट स्वरूपाच्या आहेत. ‘आयएमए’नेही केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला आहे. तीन वर्षे आयुर्वेदाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आयुर्वेदाच्या डॉक्टरांना एक वर्षांची आंतरवासीयता करण्याची संधी दिली जाईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.