‘करोना’ विषाणूला रोखण्याचे आव्हान

नवी दिल्ली : नवीन करोना विषाणूचा सामना करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व युनानी औषधे उपयुक्त असल्याची शिफारस आयुष मंत्रालयाने केली आहे.

करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत सेंट्रल कौन्सिल फॉर रीसर्च इन होमिओपॅथी या संस्थेची बैठक मंगळवारी झाली त्यात होमिओपॅथीच्या मदतीने या विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करता येऊ शकेल असे सांगण्यात आले. उपाशीपोटी आर्सेनिक अल्बम ३० हे औषध तीन दिवस घेतले तर या विषाणूचा संसर्ग आटोक्यात येतो असा दावा करण्यात आला आहे. नंतर एक महिन्याने याच मात्रेत हे औषध पुन्हा घेणे आवश्यक आहे. इन्फ्लुएंझावरही हेच औषध चांगले परिणामकारक आहे. यावेळी काही आयुर्वेदिक व युनानी औषधांचीही शिफारस करण्यात आली आहे. व्यक्तिगत स्वच्छता पाळणे गरजेचे असून साबणाने हात वीस सेकंद धुणे गरजेचे आहे. आजारी व्यक्तींशी संपर्क टाळणे आवश्यक आहे. करोनाची शंका असल्यास मास्क लावून थेट जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करणे महत्त्वाचे आहे. करोना विषाणूच्या संशयित रुग्णांवर महाराष्ट्र, गोवा, ओदिशा व केरळ या राज्यात देखरेख सुरू आहे.

आयुष मंत्रालयाची  शिफारस 

अगस्त्य हरितकी पाच ग्रॅम दिवसातून दोनदा- गरम पाण्याबरोबर, समशमनी वटी ५०० ग्रॅम दिवसातून दोनदा, त्रिकटू (पिंपळी, मारीच, सुंठी) पावडर पाच ग्रॅम, तुलसी ३-५ पाने (१ लिटर पाण्यात त्रिकटू व तुलसी टाकून पाणी अर्धे शिल्लक राहील असे उकळणे तो काढा पिणे), प्रतिमर्श नस्य- अणु तेल, तिळाचे तेल सकाळी दोन्ही नाकपुडय़ात टाकणे, षडांग पाणी (मुस्ता, पारपट, उशीर, चंदन, उडीच्या व नागर) यांची दहा ग्रॅम पूड एक लिटर पाण्यात उकळावी व ते पाणी अर्धे शिल्लक उरेल इतके उकळावे. तो काढा प्यावा.

होमिओपॅथिक औषध- उपाशीपोटी आर्सेनिक अल्बम ३० हे औषध तीन दिवस दर महिन्याला घेणे.

युनानी औषधे- शरबत उनाब रोज १०-२० मि.ली., त्रियाक अर्बा ३ ते ५ ग्रॅम रोज दोनदा, त्रियाकनझला  पाच ग्रॅम रोज दोनदा, खमीराल मारवारीद ३-५ ग्रॅम एकदा, टाळू व छातीवर रोगणबाबुना, रोगण मॉम, कफुरी बाम यांचा मसाज, नाक पुडय़ांना रोगनबनाफशा लावणे, अर्कअजीब ४-८ थेंब रोज चारदा पाण्याबरोबर घेणे, ताप असल्यास हब्ब ए इकसीर बुखारच्या  २  गोळ्या कोमट पाण्याबरोबर दोनदा घेणे, शरबतनाझला १० मि.ली मात्रेत १०० मि.ली कोमट पाण्याबरोबर रोज दोनदा घेणे, क्वेर्स ए सुआल दोन गोळ्या रोज दोनदा चघळणे.